Pune | Thu, 30 July 2026

No Ad Available

‘पराक्रम दिना’ निमित्त राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व रिल्स स्पर्धांचे आयोजन

Admin | 1 views
‘पराक्रम दिना’ निमित्त राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व रिल्स स्पर्धांचे आयोजन

मुंबई, दि. ३० : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेच्या वतीने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी १८ ऑगस्ट हा दिवस राज्यभरात ‘पराक्रम दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या शौर्याचा, पराक्रमाचा व राष्ट्रनिष्ठेचा परिचय नवीन पिढीला व्हावा, या उद्देशाने राज्यभरात १ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत विविध राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

या पराक्रम दिन निमित्ताने शाळा, महाविद्यालये व खुल्या गटातील नागरिकांसाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या जात असून जास्तीत जास्त नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले आहे. पराक्रम दिन साजरा करण्यासंदर्भात अमृत संस्थेमार्फत ‘पराक्रम दिन समिती’ स्थापन करण्यात आलेली असून त्या समितीमध्ये काकासाहेब विधाते, पांडुरंग बलकवडे, जगन्नाथ लडकत, मोहन शेटे, मंगेश खाडिलकर, कौमुदी परांजपे या इतिहास तज्ञ आणि अभ्यासक यांचा समावेश आहे.

‘पराक्रम दिन’ स्पर्धांचे गट व स्वरुप पुढीलप्रमाणे:-

१. निबंध स्पर्धा

गट: शालेय गट, महाविद्यालयीन गट व खुला गट.

नियम व अट:

शब्दमर्यादा: जास्तीत जास्त १००० शब्द, निबंध मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत टाईप करून त्याची पीडीएफ फाईल अपलोड करावी. निबंधासाठी लागणारे संदर्भ ‘अमृत पराक्रम दिन’च्या संकेतस्थळावर (Website) दिलेल्या लिंक्स, संदर्भ पुस्तके व माहिती पुस्तिकेवरच आधारित असावेत.

बक्षीसपात्र निबंधांबाबत परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील

२. वक्तृत्व स्पर्धा

गट: शालेय गट, महाविद्यालयीन गट व खुला गट.

नियम व अट:

स्पर्धकाने स्वभाषणातील जास्तीत जास्त ७ मिनिटांचा व्हिडिओ सादर करणे अपेक्षित आहे. व्हिडिओ स्वतःचा, ओरिजिनल, स्पष्ट व ठळक आवाजातील असावा. व्हिडिओमध्ये कोणतेही व्हिज्युअल इफेक्ट्स, साऊंड इफेक्ट्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता जनरेटेड इमेजेस वापरू नयेत. उत्तम गुणवत्तेचा व्हिडिओ तयार करून ‘अमृत पराक्रम दिन’च्या वेबसाईटवर अपलोड करावा. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

३. रिल्स स्पर्धा

गट: महाविद्यालयीन गट व खुला गट.

प्रवेशिका पाठवण्याची मुदत व अधिक माहिती

कालावधी: १ ऑगस्ट २०२६ ते १५ ऑगस्ट २०२६

सहभाग कसा नोंदवाल?

स्पर्धेचे स्वरूप, विषय, बक्षीसे आणि अधिकृत नियमावली ‘पराक्रम दिन’च्या अधिकृत संकेतस्थळावर

(https://parakramdin.mahaamrut.org.in/) उपलब्ध करून देण्यात आली आहे.

संदर्भ पुस्तके आणि ई बुक :

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्याशी संबंधित शेकडो पुस्तके उपलब्ध आहेत. तथापि या स्पर्धांसाठी निवडण्यात आलेल्या विषयांसाठी निवडक संदर्भ पुस्तके ‘पराक्रम दिन समिती’ निश्चित केलेली आहेत. त्यांची यादी वरील संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे थोरले बाजीराव पेशवे यांचा जीवन प्रवास अतिशय सोपा आणि संक्षिप्त पद्धतीने ई बुक स्वरूपात या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आणि या ई बुकच्या आधारावरच प्रश्नावली देखील तयार करण्यात आलेली आहेत.

सर्व शाळा व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांनी तसेच सर्व इच्छुकांनी या उपक्रमात उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन ‘अमृत’ संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले आहे.

0000

शैलजा पाटील/विसंअ

 

 


Join WhatsApp