प्रतिनिधी – राहुल मोरे
गुरुकुल विद्यामंदिर संस्थेत आज थोर समाजसुधारिका व भारतातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा अश्विनी नरुटे होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी शहानुर मुलाणी, शुभांगी काळे, मनीषा भालेराव, अश्विनी सुतार यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात अश्विनी नरुटे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर सविस्तर प्रकाश टाकला. स्त्री शिक्षणाचा पाया घालून समाजातील अज्ञान, अन्याय व विषमता दूर करण्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष आजही समाजाला मार्गदर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.
“शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन असून मुलींच्या शिक्षणाकडे सकारात्मक दृष्टीने पाहणे ही काळाची गरज आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
तसेच विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा आदर्श घेऊन शिक्षणाबरोबरच समाजसेवेतही सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. महिलांनी आत्मविश्वास, शिक्षण व स्वाभिमानाच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण करावी, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नामदेव तरंगे व राधिका घनवट यांनी केले.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण होऊन स्त्री शिक्षण व समानतेचे महत्त्व अधोरेखित झाले.
