राहुल मोरे (समाजसत्ता प्रतिनिधी), इंदापूर :
इंदापूर तालुक्यातील दत्तनगर येथील संस्कार खिलारे याने राष्ट्रीय स्तरावर आपल्या कौशल्याची चुणूक दाखवत झारखंड राज्यातील रांची येथे झालेल्या ६९ व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत तिरंदाजी प्रकारात रौप्य पदक पटकावले. या उल्लेखनीय कामगिरीमुळे इंदापूर तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रांची येथील बिरसा मुंडा अॅथलेटिक्स स्टेडियममध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत देशभरातील दर्जेदार खेळाडूंशी सामना करत संस्कारने संयम, अचूकता व मानसिक स्थैर्य यांचे प्रभावी दर्शन घडवले. प्रत्येक फेरीत आत्मविश्वासपूर्ण खेळ करत त्याने भारतीय फेरीतील वैयक्तिक एलिमिनेशन प्रकारात अंतिम फेरी गाठत रौप्य पदकावर आपले नाव कोरले.
संस्कार हा गुरुकुल गोखळी येथे इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत असून अभ्यासासोबतच क्रीडासाधनेतही सातत्य राखत आहे. प्रशिक्षक जुबेर पठाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने नियमित सराव करत राष्ट्रीय पातळीवर हे यश संपादन केले. या यशामागे त्याचे पालक संजय खिलारे व सुप्रिया खिलारे यांचा मोलाचा पाठिंबा लाभला आहे.
संस्कारच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण हरणावळ, संस्थेचे मुख्याध्यापक विश्वास हुलगे, प्राथमिक विभाग प्रमुख सुरेश वरकड तसेच माध्यमिक विभाग प्रमुख रमेश गोफणे यांनी त्याचे अभिनंदन केले असून त्याच्या उज्ज्वल क्रीडा भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. शैक्षणिक, क्रीडा व सामाजिक क्षेत्रातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
