Pune | Thu, 30 July 2026

No Ad Available

१०२ रुग्णवाहिकासाठी “कॅशलेस पेट्रोकार्ड’चे आरोग्यमंत्र्यांचे हस्ते उदघाटन

Admin | 2 views
१०२ रुग्णवाहिकासाठी “कॅशलेस पेट्रोकार्ड’चे आरोग्यमंत्र्यांचे हस्ते उदघाटन

मुंबई, दि. ३० : राज्यातील आरोग्य सेवा अधिक तंत्रस्नेही करण्यासाठी शासन प्रयत्नशील असुन, कॅशलेस ‘पेट्रोकार्ड’ उपक्रम हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे.  यामुळे १०२ रुग्णवाहिका सेवांचे व्यवस्थापन अधिक सक्षम होईल, असा विश्वास सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला. मुंबईतील आरोग्य सेवा आयुक्तालय येथे आयोजित कार्यक्रमात ‘कॅशलेस पेट्रोकार्ड  उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी आरोग्य सेवा आयुक्त, संजय काटकर, अतिरिक्त आयुक्त जगन्नाथ विरकर, आरोग्य संचालक डॉ.नितीन अंबाडेकर, सहसंचालक सुनिता गोलाईत, प्रकल्प संचालक (ईएमएस) रवींद्र सावंत,उपसंचालक जयंत मुळे, तसेच दूरदृष्य प्रणाली द्वारे संचालक विजय कंदेवाड, व राज्यातील सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि हिंदुस्थान पेट्रो केमिकल लिमिटेड कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी आरोग्यमंत्री आबिटकर म्हणाले की, आरोग्य सेवा ही सर्वसामान्य नागरिकांसाठी जीवनदायी व्यवस्था आहे. या सेवांमध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून, विश्वासार्ह आणि पारदर्शक व्यवस्था उभारणे गरजेचे आहे. पेट्रोकार्डसारख्या अभिनव उपक्रमामुळे रुग्णवाहिकांच्या इंधन खरेदी व्यवस्थापनासह आर्थिक पारदर्शकता येईल व कामकाजातील अनावश्यक विलंब कमी होईल. आर्थिक व्यवहार अधिक पारदर्शक होतील आणि संपूर्ण यंत्रणा अधिक उत्तरदायी बनेल. यापूर्वी  १०२  रुग्णवाहिकेची सेवा माता व   बालकांसाठी  वापरात होती . यापुढे १०२ रुग्णवाहिका सर्व रुग्णासाठी उपलब्ध करून देण्यात येत असून, ही सेवा अधिक प्रभावी, सक्षम करुन १०८ रुग्णवाहिकेला पर्यायी व्यवस्था तयार करावी अशा सूचना आरोग्य मंत्र्यांनी यावेळी दिल्या.

राज्यातील शासकीय वाहनाना वेळेत इंधन उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी येत होत्या, त्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून आरोग्य सेवेला नवी दिशा देणारा  ‘कॅशलेस पेट्रोकार्ड’ हा अभिनव उपक्रम कार्यान्वित करण्यात आला आहें.  या माध्यमातून राज्यातील ३१९५ रुग्णवाहिकांना एचपीसीएल कंपनीचे ‘कॅशलेस पेट्रोकार्ड’ देण्यात येणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रभावी मॉनिटरिंगच्या माध्यमातून नागरिकांना अधिक जलद आणि दर्जेदार आपत्कालीन आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.एचपीसीएल यांच्या सहकार्याने  कॅशलेस पेट्रो कार्ड सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कोरोनासारख्या संकटाच्या काळात सार्वजनिक आरोग्य यंत्रणेने बजावलेल्या उल्लेखनीय भूमिकेची आठवण करून देत, राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मोठा आधार असुन, नागरिकांचा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करण्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने सेवाभावाने आणि जबाबदारीने कार्य करावे, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी  केले.

पेट्रोकार्ड उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आरोग्य आयुक्त, आयटी विभाग तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मंत्री आबिटकर यांनी विशेष अभिनंदन केले. भविष्यातही तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

0000

दत्तात्रय कोकरे/विसंअ

 

 


Join WhatsApp