Pune | Wed, 17 June 2026

No Ad Available

हाफकिन संस्था आणि ‘चक्र’ यांच्यात सामंजस्य करार

Admin | 5 views
हाफकिन संस्था आणि ‘चक्र’ यांच्यात सामंजस्य करार

मुंबई, दि. १७ : हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्था आणि महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधे विभागांतर्गत कार्यरत सेंटर फॉर हेल्थ, अप्लाइड नॉलेज अँड रिसर्च ऑटोनॉमी (चक्र) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. १८९९ मध्ये स्थापन झालेली हाफकिन संस्था ही देशातील सर्वात जुन्या जैववैद्यकीय संशोधन संस्थांपैकी एक असून संसर्गजन्य रोगांवरील संशोधन, प्रशिक्षण आणि चाचणी क्षेत्रात अग्रणी भूमिका बजावत आहे.

या सामंजस्य कराराअंतर्गत प्राध्यापक विकास, क्लिनिकल ट्रायल्स, जैववैद्यकीय संशोधन, ट्रान्सलेशनल मेडिसिन, जीनोमिक्स, सार्वजनिक आरोग्य तसेच क्षमता विकास या क्षेत्रांमध्ये दोन्ही संस्था संयुक्तपणे कार्य करणार आहेत. याशिवाय संयुक्त संशोधन प्रकल्प, प्रशिक्षण कार्यक्रम, प्राध्यापकांची देवाण-घेवाण आणि संशोधनासाठी उपलब्ध पायाभूत सुविधांचा परस्पर वापर यांनाही प्रोत्साहन दिले जाणार आहे.

या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण, संशोधन, क्लिनिकल ट्रायल्स आणि आरोग्यसेवा क्षेत्रात उत्कृष्टतेला चालना मिळण्यास मदत होणार असून नव्या संशोधनास संधी आणि ज्ञानवृद्धीसाठीही महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. या कराराच्या वेळी वैद्यकीय शिक्षण व औषधे विभागाचे सचिव धीरज कुमार, चक्रच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रंजना कुमार, मुख्य प्रशासकीय अधिकारी ब्रिगेडियर मुलगुंद, हाफकिन संस्थेच्या संचालक डॉ. सुवर्णा खरात, मुख्य प्रशासकीय अधिकारी अजित जगताप, सहाय्यक संचालक डॉ. उषा पद्मनाभन, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. वृषाली पाटील तसेच प्रशिक्षण विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

 

0000

दत्तात्रय कोकरे/विसंअ

 

 


ताज्या बातम्या

Join WhatsApp