Pune | Thu, 30 July 2026

No Ad Available

नवी दिल्लीतील ‘मऱ्हाटी एम्पोरियम’चा कायापालट करणार -उद्योगमंत्री उदय सामंत

Admin | 6 views
नवी दिल्लीतील ‘मऱ्हाटी एम्पोरियम’चा कायापालट करणार -उद्योगमंत्री उदय सामंत

नवी दिल्ली दि. २३: नवी दिल्ली येथील महाराष्ट्राच्या मऱ्हाटी एम्पोरियमचा सर्वसमावेशक विकास करून तेथे महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती व परंपरेचे प्रतिबिंब टिपणारे भव्य व आकर्षक दालन उभारण्याचा निर्णय राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घेतला. उद्योगमंत्री श्री सामंत यांनी आज नवी दिल्लीतील महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ लिमिटेडच्या अखत्यारीत असलेल्या मऱ्हाटी एम्पोरियमला सदिच्छा भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि अधिकाऱ्यांसोबत सविस्तर आढावा बैठक घेतली.

यावेळी मार्गदर्शन करतांना उद्योगमंत्री श्री सामंत म्हणाले,नवी दिल्ली हे देशाचे केंद्रस्थान असून येथे जगभरातून पर्यटक आणि उद्योजक येतात. आपल्या महाराष्ट्रातील ग्रामीण कारागीर, महिला बचत गट आणि स्थानिक उद्योजकांच्या हाताला काम मिळून त्यांच्या कलागुणांना ‘ग्लोबल प्लॅटफॉर्म’ मिळणे आवश्यक आहे. या नूतनीकरणामुळे महाराष्ट्राची उत्पादने दिल्लीच्या मुख्य बाजारपेठेत आपले वेगळे स्थान निर्माण करतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

एम्पोरियमची पुनर्रचना करताना ते केवळ विक्री केंद्र न राहता, महाराष्ट्राच्या समृद्ध वारशाचे दर्शन घडवणारे ‘अनुभूती केंद्र’ म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने आराखडा तयार करावा. तसेच या दालनाच्या माध्यमातून जगप्रसिद्ध पैठणी व हातमाग, कोल्हापुरी चप्पल, वारली पेंटिंग्स, हस्तकलेच्या वस्तू आणि महाराष्ट्राचे स्थानिक खाद्यपदार्थ (गृहउद्योग) एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

श्री सामंत यांनी दिल्लीतील काश्मीर, गुजरात, बिहार या एम्पोरियम्सना भेट देऊन  डिझाइन आणि विपणन पद्धतींबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी  महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ लिमिटेडचे महाव्यवस्थापक संगीता वराडे, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे,कंपनी सेक्रेटरी अक्षय पाठक यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

000000

महाराष्ट्र परिचय केंद्र

नवी दिल्ली


ताज्या बातम्या

Join WhatsApp