Pune | Fri, 31 July 2026

No Ad Available

पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते एकल वापर प्लास्टिक बंदी मोहिमेचे उद्घाटन

Admin | 9 views
पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते एकल वापर प्लास्टिक बंदी मोहिमेचे उद्घाटन

बीड दि. १६ (जिमाका) :- वाढत्या लोकसंख्येमुळे आणि बाजारपेठांच्या विस्तारामुळे प्लास्टिक कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. यावर मात करण्यासाठी बीड जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रांमध्ये 30 दिवसांची विशेष एकल वापर प्लास्टिक बंदी (सिंगल युज प्लास्टिक) मोहिम राबविली जात आहे. या मोहिमेचे अधिकृत उद्घाटन पर्यावरण, वातावरणीय बदल तथा पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.

एकल वापर प्लास्टीक बंदी विशेष मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात करण्यात आला. या प्रसंगी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान, निवासी उपजिल्हाधिकारी सतिश सोनी यांच्यासह संबंधित यंत्रणेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बीड जिल्ह्यातील 6 नगरपरिषदा आणि 5 नगरपंचायती अशा एकूण 11 शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘सिंगल युज प्लास्टिक मुक्त शहर’ ही संकल्पना राबवली जात आहे. जिल्हा प्रशासन अधिकारी जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मोहिमेची अंमलबजावणी पुढील 3 टप्प्यात केली जाईल.

टप्पा 1 मध्ये 15 ते 25 जुलै कालावधीत व्यापक जनजागृती मोहिम राबविण्यात येईल.   टप्पा 2 मध्ये 26 जुलै ते 5 ऑगस्ट कालावधीत व्यापारी प्रतिष्ठाने आणि बाजारपेठांमध्ये विशेष तपासणी व दंडात्मक कारवाई राबविण्यात येईल. तर  टप्पा 3 मध्ये 6 ते 15 ऑगस्ट कालावधीत प्लास्टिकमुक्त शहर संकल्पनेतंर्गत विविध विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत. कापडी व पर्यावरणपूरक पिशव्यांच्या वापराला प्रोत्साहन देणे. व्यापारी, शाळा, महाविद्यालये आणि स्वयंसेवी संस्थांना मोहिमेत जोडणे. प्लास्टिक संकलन करणे आणि नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे. ही मोहिमेची वैशिष्ट्ये आहेत.  अशी माहिती जिल्हा प्रशासन अधिकारी संभाजी वाघमारे यांनी यावेळी दिली.

सार्वजनिक आरोग्य आणि घनकचरा व्यवस्थापनासमोरील आव्हाने दूर करण्यासाठी नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

-*-*-*-*-


ताज्या बातम्या

Join WhatsApp