Pune | Thu, 30 July 2026

No Ad Available

श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन प्रकल्पांना गती द्यावी – मंत्री आदिती तटकरे

Admin | 1 views
श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन प्रकल्पांना गती द्यावी – मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. ३० : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन विकासाला अधिक गती देण्यासाठी संबंधित विभागांनी आवश्यक प्रशासकीय, तांत्रिक व कायदेशीर कार्यवाही निर्धारित कालावधीत पूर्ण करून प्रकल्पांच्या अंमलबजावणीला गती द्यावी, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या विकासाबाबत मंत्रालय येथे बैठक झाली. पर्यटन विकासाशी संबंधित सर्व प्रकल्पांची अंमलबजावणी वेळेत पूर्ण होण्यासाठी विविध विभागांनी परस्पर समन्वय राखून आवश्यक प्रशासकीय, तांत्रिक व कायदेशीर प्रक्रिया गतीने पूर्ण कराव्यात, असे निर्देश मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी दिले.

यावेळी दिवेआगर समुद्रकिनाऱ्याच्या सुशोभीकरण प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रकल्पाचा प्रस्ताव महाराष्ट्र मेरीटाईम मंडळाकडे तातडीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच सागरी किनारपट्टी नियमन क्षेत्र अंतर्गत आवश्यक परवानग्या मिळविण्यासाठी Permissible Activities च्या अनुषंगाने करता येणाऱ्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. हरिहरेश्वर प्रदक्षिणा मार्गाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या वन विभागाच्या परवानग्या मिळविण्याच्या दृष्टीने Digital GPS Survey तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या.

श्रीवर्धन तालुक्यातील आरावी समुद्रकिनाऱ्याला ‘ब्ल्यू फ्लॅग बीच’ म्हणून विकसित करण्याच्या प्रस्तावावर सकारात्मक चर्चा झाली. या उपक्रमामुळे पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन सुविधा उपलब्ध होतील आणि स्थानिकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली. तसेच श्रीवर्धन तालुक्यातील काळिंजे परिसरात मँग्रोव्ह पर्यटन विकसित करण्याच्या प्रस्तावाबाबतही नियोजन करण्यात येत असून, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत पर्यटन विकास यांचा समतोल साधणारा हा महत्त्वपूर्ण प्रकल्प ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

बैठकीला रायगड जिल्हाधिकारी श्री. किसन जावळे (दूरदृश्य प्रणालीद्वारे), तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

0000

अश्विनी पुजारी/स.सं.


Join WhatsApp