Pune | Thu, 30 July 2026

No Ad Available

तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांना गती द्या – मंत्री गुलाबराव पाटील

Admin | 9 views
तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांना गती द्या  –  मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, दि. २९ : सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील निमणी, बेंद्री, नागाव (नि), शिरगाव (कवठे) आणि नेहरूनगर या गावांसाठी जलजीवन मिशनअंतर्गत स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. यापैकी बेंद्री आणि शिरगाव (कवठे) येथील योजनांची कामे पूर्ण झाली असून निमणी आणि नागाव (नि) येथील कामे प्रगतीपथावर आहेत. नेहरूनगर येथील योजनेचे जलस्रोत निकामी झाल्यामुळे काम पूर्ण होऊ शकले नसल्याने या गावासाठी नव्याने प्रस्ताव सादर करण्यात यावा, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

मंत्रालयात मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार रोहित आर. आर. पाटील, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अमगोथू श्रीरंगा नायक, पाणीपुरवठा विभागाच्या सहसचिव गीता कुलकर्णी, मुख्य अभियंता तथा विशेष कार्य अधिकारी प्रशांत भामरे, सांगली जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता सोनल पाटील तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सांगली कार्यालयाचे कार्यकारी अभियंता अमित आडे उपस्थित होते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सांगलीच्या मुख्य अभियंता वैषाली आवटे या दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाल्या.

बैठकीत सांगली जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील ज्या पाणीपुरवठा योजनांची अंदाजित किंमत ₹५० लाखांपर्यंत आहे, अशा सर्व योजनांना आयुक्त स्तरावर तातडीने मान्यता देण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना मंत्री पाटील यांनी दिल्या. याशिवाय कवठेमहांकाळ तालुक्यातील २६ पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेऊन त्या निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी प्रभावी नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी दिले. योजनांची कामे वेळेत पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांविरुद्ध नियमानुसार तातडीने कार्यवाही करण्याचे आदेशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

राज्यातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित व शाश्वत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या योजनांची गुणवत्ता आणि वेळेत अंमलबजावणी यावर विशेष भर देण्यात येत असून, प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असेही मंत्री पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

0000

गजानन पाटील/विसंअ

 

 

 


Join WhatsApp