Pune | Thu, 30 July 2026

No Ad Available

ठाणे सामान्य रुग्णालयाच्या कामाचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा रुग्णालयाच्या वीज जोडणीचे काम ‘फास्टट्रॅक’वर करण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

Admin | 1 views
ठाणे सामान्य रुग्णालयाच्या कामाचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा रुग्णालयाच्या वीज जोडणीचे काम ‘फास्टट्रॅक’वर करण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई, दि. २८ : ठाणे आणि लगतच्या पालघर जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना जागतिक दर्जाच्या आणि अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ठाणे येथील ९०० खाटांचे अत्याधुनिक जिल्हा सामान्य रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय आणि सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या प्रकल्पाचे काम अत्यंत वेगाने आणि ‘फास्टट्रॅक’ पद्धतीने पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत दिले.

उपमुख्यमंत्री यांच्या समिती कक्षात झालेल्या या बैठकीत ठाणे सिव्हिल हॉस्पिटलच्या सद्यस्थितीचा आणि आतापर्यंत झालेल्या कामांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री सर्वश्री दादाजी भुसे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शंभूराज देसाई, संजय शिरसाट, संजय राठोड, प्रताप सरनाईक यांच्यासह उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नवीन सोना, आरोग्य विभागाचे सचिव ई. रविंद्रन, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार उपस्थित होते.

प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यातील कामांची गती वाढवतानाच प्रशासकीय पातळीवरील दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले.

रुग्णालयाची इमारत पूर्ण झाली असून, वीज जोडणीअभावी रुग्णालयाचे काम सुरू करता येत नसल्याचा मुद्दा बैठकीत चर्चेत आला. यानंतर रुग्णालयासारख्या अत्यावश्यक सेवेसाठी आवश्यक असलेली वीज जोडणीची सर्व कामे विहित वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.याशिवाय रुग्णालयाच्या इमारतीची नियमित आणि उच्च दर्जाची स्वच्छता, रुग्णालयासाठी आवश्यक असलेल्या अद्ययावत वैद्यकीय यंत्रसामग्रीची तातडीने खरेदी तसेच काही दिवसांपूर्वी शासनाकडून मंजूर करण्यात आलेली १०७८ नवीन पदे भरण्याची संपूर्ण प्रक्रिया गतिमान करावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले.या महत्त्वाकांक्षी ९०० खाटांच्या विशाल संकुलामध्ये ५०० खाटांचे मुख्य जिल्हा रुग्णालय, २०० खाटांचे स्वतंत्र महिला व बाल रुग्णालय तसेच २०० खाटांचे संदर्भ सेवा रुग्णालय एकाच छताखाली कार्यरत राहणार आहे.

यामध्ये प्रामुख्याने कार्डिओलॉजी, न्यूरोलॉजी, नेफ्रोलॉजी आणि ऑन्कोलॉजी यांसारख्या गंभीर आजारांच्या उपचारांसाठी सुपरस्पेशालिटी विभाग उपलब्ध असणार आहेत. तसेच आपत्कालीन आणि गंभीर रुग्णांच्या उपचारांसाठी रुग्णालयाच्या इमारतीच्या टेरेसवर विशेष ‘हेलीपॅड’ची रचना करण्यात आली असून, तेथे एअर अॅम्ब्युलन्स सहज उतरू शकणार आहे. याशिवाय रुग्णालयात एकूण १६ आधुनिक शल्यचिकित्सागृहे कार्यान्वित केली जाणार आहेत.

हा प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील लाखो सर्वसामान्य नागरिकांना उपचारासाठी अन्यत्र जाण्याची गरज भासणार नाही. त्यांना त्यांच्या जिल्ह्यातच अत्याधुनिक आणि सर्वसमावेशक वैद्यकीय उपचार विनामूल्य मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

००००


Join WhatsApp