Pune | Fri, 19 June 2026

No Ad Available

योग साधनेतून अन्वीने दिव्यांगाच्या मर्यादेवर केली मात

Admin | 2 views
योग साधनेतून अन्वीने दिव्यांगाच्या मर्यादेवर केली मात

मुंबई, दि. १९ :  प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित ‘रबर गर्ल ऑफ इंडिया‘ म्हणून ओळखली जाणारी दिव्यांग योगसाधिका अन्वी विजय झांझरूकिया हिने योग साधनेच्या माध्यमातून दिव्यांगत्व ही मर्यादा नसून जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर मोठे यश संपादन करता येते, हे आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केले आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.

१२ व्या योग दिनानिमित्त सामान्य प्रशासन विभागातर्फे आज मंत्रालयात योग प्रात्यक्षिकांचे आयोजन केले होते. यावेळी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांच्यासह मंत्रालयातील विविध अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अन्वी झांझरूकिया हिने आकर्षक योग प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तिने देशभरातील ५० हून अधिक योग स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवत 50 पेक्षा अधिक पदके पटकावली आहेत. तसेच २०० हून अधिक योगासने करण्याचे कौशल्य तिने आत्मसात केले आहे. दिव्यांगत्वावर यशस्वीपणे मात करत योगाच्या माध्यमातून आरोग्य आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश लाखो लोकांपर्यंत पोहोचविण्याचे उल्लेखनीय कार्य ती करत आहे.

डनुकत्याच चंदिगढ येथे झालेल्या अखिल भारतीय नागरी सेवा योगासन स्पर्धा २०२५-२६ मधील महाराष्ट्राच्या विजेत्यांचाही गौरव करण्यात आला. ४० ते ५० वर्षे वयोगटात शुभांगी चिकटे यांनी प्रथम क्रमांक, ४० पेक्षाकमी वयोगटात श्रीकांत घोलकर यांनी द्वितीय क्रमांक, तसेच ५० वर्षांवरील गटात दत्तात्राम सावंत आणि जगन्नाथ लांडगे यांना संयुक्तिकरित्या द्वितीय क्रमांक पटकावत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. या सर्व विजेत्यांनी मंत्रालयात योगाची प्रात्यक्षिके सादर केली. अतिरिक्त मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. सचिवालय जिमखान्याच्या योग शाखेच्या सचिव अपर्णा जाधव यावेळी उपस्थित होत्या.

कार्यक्रमात योगा इन्स्टिट्यूटच्यावतीने समीर व्यास यांनी मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना खूर्ची योगाचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले. योगाचे नियमित आचरण करून निरोगी आणि संतुलित जीवनशैली अंगीकारण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ

 


Join WhatsApp