Pune | Mon, 01 June 2026

No Ad Available

‘दिलखुलास’ कार्यक्रमात डॉ. विक्रम आरळेकर यांची ४ आणि ५ जूनला विशेष मुलाखत

Admin | 3 views
‘दिलखुलास’ कार्यक्रमात डॉ. विक्रम आरळेकर यांची ४ आणि ५ जूनला विशेष मुलाखत

मुंबई, दि. १: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त विशेष भाग प्रसारित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे कोल्हापूर जिल्हा सल्लागार डॉ. विक्रम आरळेकर यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार असून, तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणारे आरोग्यविषयक, सामाजिक आणि आर्थिक दुष्परिणाम याविषयी ते सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत ४ आणि ५ जून २०२६ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर, तसेच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. ही मुलाखत कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयाच्या सहायक संचालक वृषाली पाटील यांनी घेतली आहे.

या मुलाखतीच्या माध्यमातून तंबाखूच्या वाढत्या व्यसनाची कारणे, तरुणांमध्ये वाढणारे गुटखा, पानमसाला, सिगारेट, ई-सिगारेट आणि व्हेपिंगचे आकर्षण तसेच तंबाखू सेवनामुळे उद्भवणारे कर्करोग, हृदयरोग आणि फुफ्फुसांच्या विकारांसारख्या गंभीर आजारांबाबत माहिती दिली जाणार आहे. यासोबतच राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध जनजागृती मोहिमा आणि शासनाच्या उपाययोजनांचाही आढावा घेण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात तंबाखूमुक्ती समुपदेशन केंद्रांची भूमिका, विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारे विशेष उपक्रम, तंबाखू विक्रीसंदर्भातील कायदेशीर तरतुदी, ‘पॅसिव्ह स्मोकिंग’चे धोके, तसेच पालक, शिक्षक आणि समाजाची जबाबदारी याविषयी सखोल चर्चा करण्यात येणार आहे. याबरोबरच तंबाखूचे व्यसन सोडू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी उपलब्ध असलेल्या समुपदेशन सेवा आणि व्यसनमुक्तीच्या विविध उपायांबाबतही महत्त्वपूर्ण माहिती या मुलाखतीच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.

००००

जयश्री कोल्हे/स.सं.


Join WhatsApp