Pune | Thu, 15 January 2026

No Ad Available

‘दिलखुलास’ व ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची विशेष मुलाखत

Admin | 12 views
‘दिलखुलास’ व ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची विशेष मुलाखत

मुंबई, दि. ३०: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, विशेषतः महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने केलेली तयारी, नियोजन तसेच मतदारांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची सविस्तर माहिती देणारी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची विशेष मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमांतून प्रसारित होणार आहे.

राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या या मुलाखतीत, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार निवडणुका वेळेत, पारदर्शक व सुरळीत पार पाडण्यासाठी आयोगाकडून व्यापक नियोजन करण्यात येत असल्याचे आयुक्त वाघमारे यांनी स्पष्ट केले. मनुष्यबळ व्यवस्थापन, मतदान केंद्रांची संख्या, ईव्हीएमची उपलब्धता, दुबार मतदारांबाबत घेतली जाणारी दक्षता तसेच मतदारांसाठी विकसित करण्यात आलेल्या ‘मताधिकार’ मोबाईल अॅपमुळे निवडणूक प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शक झाल्याचे त्यांनी नमूद केले. मतदानाच्या दिवशी मतदारांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी मतदान केंद्रांवर आवश्यक सोयीसुविधा तसेच ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांसाठी विशेष व्यवस्था, मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी राबविण्यात येणारे विविध मतदार जागृती उपक्रम यावरही त्यांनी प्रकाश टाकला. मुलाखतीच्या शेवटी आयुक्त वाघमारे यांनी ‘दिलखुलास’ व ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमांच्या माध्यमातून सर्व मतदारांना लोकशाहीच्या या महत्त्वपूर्ण उत्सवात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन केले. निवेदक स्मिता गव्हाणकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत शनिवार, 3, सोमवार, 5 आणि मंगळवार, 6 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर प्रसारित होणार असून, ‘न्यूज ऑन एआयआर’ (News On AIR) या मोबाईल अॅपवरही ऐकता येईल.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार, 6 जानेवारी 2026 रोजी रात्री 8.00 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे, तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही ही मुलाखत पाहता येईल.

X (Twitter): https://twitter.com/MahaDGIPR

Facebook: https://www.facebook.com/MahaDGIPR

YouTube: https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

०००

जयश्री कोल्हे/स.सं.


Join WhatsApp