दि. २३/१२/२०२५
इंदापूर नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ५ अ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सौ. दीप्ती स्वप्निल राऊत यांनी दमदार कामगिरी करत विजयी माथ्यावर झेंडा रोवला. तुफान टक्कर असलेल्या या निवडणुकीत त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांना मागे टाकत ३२१ मतांच्या आघाडीसह विजय मिळविला.
मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच यांची आघाडी कायम होती. अखेरच्या फेरीत ही आघाडी अधिक दृढ झाली आणि त्यांची निवड अधिकृतपणे घोषित करण्यात आली. विजयाची घोषणा होताच कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण पसरले. समर्थकांनी फटाके फोडून, मिठाई वाटून आनंद व्यक्त केला.
सदर निवडणुकीत जल्लोष साजरा करत असताना माजी नगरसेवक स्वप्निल राउत म्हणाले की,आपल्या प्रभागातील मतदारांनी पत्नीवर विश्वास दाखवत स्पष्ट बहुमताने विजय मिळवून दिल्याबद्दल सर्व मतदार बंधू व भगिनीचे मनापासून आभार व मी गेल्या कार्यकाळात केलेल्या कामांचा सकारात्मक परिणाम या निवडणुकीत दिसून आला. जलवाहिनी, स्वच्छता, रस्ते-अंतर्गत गटारीची सुधारणा, व महिलांसाठी उपक्रम या कामांमुळे विभागात विकासाची गती वाढली होती.
विजयानंतर प्रतिक्रिया देताना दिप्ती राऊत म्हणाल्या, “हा विजय माझा नसून प्रभागातील जनतेचा आहे. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. विकासाच्या कामांना प्राधान्य देत पारदर्शकपणे कारभार चालविण्याचा प्रयत्न करू.”
स्थानिकांमध्ये आता नव्या नगरसेवकांकडून पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील विकासकामांबाबत मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.

