Pune | Mon, 01 June 2026

No Ad Available

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाच्या जनजागृतीसाठी ‘कसं काय?’ मोहिमेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

Admin | 13 views
‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाच्या जनजागृतीसाठी ‘कसं काय?’ मोहिमेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई, दि. १९ : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाच्या जनजागृतीसाठी ‘कसं काय?’ या विशेष मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आला. या निमित्ताने ‘कसं काय?’ या जनजागृतीपर गाण्याचे तसेच पोस्टर्सचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर तसेच सर्व विभागाचे मंत्री यावेळी उपस्थित होते.

ग्रामीण महाराष्ट्रात आरोग्य जागृतीची नवी चळवळ निर्माण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे.सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या पुढाकारातून ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हे अभियान राबविण्यात येत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक तसेच वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

‘कसं काय?’ या मोहिमेच्या माध्यमातून लोकसहभाग, स्वच्छता, पोषण, निरोगी जीवनशैली आणि ग्रामस्तरावरील आरोग्य सक्षमीकरणाचा संदेश अत्यंत प्रभावी आणि आकर्षक पद्धतीने मांडण्यात आला आहे. त्यामुळे. ‘कसं काय?’ हे गाणे केवळ प्रचारगीत न राहता, ग्रामीण महाराष्ट्रातील आरोग्य जनजागृतीचे प्रतीक बनेल, असा विश्वास मंत्रिमंडळ बैठकीत व्यक्त करण्यात आला.

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हे अभियान राज्यातील ग्रामीण भाग अधिक निरोगी, स्वच्छ आणि आरोग्यदायी करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आले आहे. या अभियानामध्ये उपचारांपेक्षा प्रतिबंधात्मक आरोग्यावर विशेष भर देण्यात आला असून, गावागावात आरोग्याविषयी सकारात्मक सामाजिक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच संदेशाला अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘कसं काय?’ हे विशेष गाणे तयार करण्यात आले आहे.

गाण्यात ग्रामीण संस्कृती, लोकभाषा आणि दैनंदिन जीवनातील संवाद यांचा प्रभावी वापर करण्यात आला आहे. त्यामुळे हे गाणे सर्वसामान्य नागरिकांना सहज आपलेसे वाटत आहे. आरोग्यदायी महाराष्ट्राच्या संकल्पनेला लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी शासनाचा हा अभिनव प्रयत्न आहे.

0000

दत्तात्रय कोकरे/विसंअ

 


Join WhatsApp