Pune | Mon, 01 June 2026

No Ad Available

दैवी, सुरेल, ‘सुमन’स्वर शांत झाला!

Admin | 5 views
दैवी, सुरेल, ‘सुमन’स्वर शांत झाला!

मुंबई, दि. ३१ : भारतीय संगीत क्षेत्रातील दैवी आणि सुरेल ‘सुमन’ असा स्वर आज शांत झाला, अशी शोकभावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

आपल्या शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, सुमनजींनी प्रारंभी चित्रकलेचेही शिक्षण घेतले. पण त्या रमल्या सुरावटींच्या दुनियेत. पुढे त्यांनी रसिकांच्या मनावर आपल्या मधाळ आणि शास्त्रीय सुरांनी सहा दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवले. त्यांच्या सुरावटींनी ५० आणि ६० चे दशक सुरेल सुरांनी भारून गेले होते. केवळ मराठीच नव्हे, तर हिंदी, बंगाली, ओडिया अशा विविध भाषांत त्यांनी आपली अमीट अशी छाप सोडली. त्यावेळच्या अविभाजित भारतातील ढाका येथे जन्म आणि पुढे मुंबईत स्थायिक अशा सुमन कल्याणपूर यांना ‘पद्मभूषण’ या नागरी पुरस्काराने सन्मानित  करण्यात आले होते.

सुमन कल्याणपूर यांनी भाव, भक्तिगीत आणि पार्श्वगायनाने भारतीय संगीत क्षेत्राला समृद्ध केले. त्यांचे हे अमुल्य असे योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांच्या जादूई स्वरांनी अजरामर झालेली गाणी सदैव आपल्यासोबत राहतील. पण नावाप्रमाणेच सुस्वभावी सुमनजी आपल्यात नसतील हे शल्य राहील. त्यांच्या निधनामुळे आपण दैवी स्वरांना आणि एका कलासक्त साधकाला मुकलो आहोत. ही कला क्षेत्राची मोठी हानी आहे, असे नमूद करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.‌ कल्याणपूर परिवार आणि असंख्य चाहत्यांच्या दुःखात सहभागी असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

००००


Join WhatsApp