
मुंबई, दि. १२ : राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संविधानाबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या संविधान जनजागृती प्रश्नमंजुषा 2025-26 या राज्यव्यापी उपक्रमाच्या वेळापत्रकात सुधारणा करण्यात आली आहे.
या उपक्रमासाठीची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया आता 16 जानेवारी 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर यांच्यामार्फत घेण्यात येणारे परीक्षापूर्व 15 दिवसांचे ऑनलाईन संविधान प्रशिक्षण 18 जानेवारी 2026 पासून सुरू होणार आहे.
हा उपक्रम महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती व जमाती आयोगाचे उपाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून, यामध्ये इयत्ता 8 वी ते पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. संपूर्ण उपक्रम पूर्णतः ऑनलाईन स्वरूपात राबविण्यात येणार आहे.
सुधारित वेळापत्रकाची नोंद सर्व संबंधित शैक्षणिक संस्था, विद्यार्थी तसेच जिल्हा प्रतिनिधींनी घ्यावी असे अनुसूचित जाती व जमाती आयोगाचे उपाध्यक्ष यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
0000
शैलजा पाटील/विसंअ
