Pune | Mon, 01 June 2026

No Ad Available

आधुनिक तंत्रज्ञानामुळे शासकीय सेवा अधिक गतिमान

Admin | 10 views
आधुनिक तंत्रज्ञानामुळे शासकीय सेवा अधिक गतिमान

मुंबई, दि. ८ : कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल प्रणाली आणि आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरामुळे शासकीय सेवा अधिक वेगवान, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख होत असल्याचे मत सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने आयोजीत टेक वारी २.० मधील तांत्रिक प्रशिक्षण सत्रात तज्ज्ञांनी व्यक्त केले.

मंत्रालयातील परिषद सभागृहात आयोजित या प्रशिक्षण सत्रात डेटा व्यवस्थापन, माहिती केंद्रे, जीपीयू आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित प्रणालींच्या वापराबाबत प्रायमस पार्टनर्सचे अभिजित धर, राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एनआयसी), महाराष्ट्राच्या राज्य सूचना अधिकारी सपना कपूर तसेच गुगलचे वरिष्ठ तांत्रिक विशेषज्ञ प्रवीण दवे यांनी मार्गदर्शन केले.

सत्राच्या प्रारंभी अभिजित धर यांनी माहिती केंद्रांची मूलभूत रचना, प्रक्रिया प्रणाली, माहिती साठवण व्यवस्था, नेटवर्क प्रणाली आणि आभासी प्रणाली याबाबत मार्गदर्शन केले. शासनाच्या विविध डिजिटल सेवा माहिती केंद्रांमधून कशा कार्यरत असतात, तसेच क्लाउड तंत्रज्ञान, माहिती सुरक्षा आणि पर्यायी माहिती केंद्र व्यवस्थेचे महत्व त्यांनी स्पष्ट केले.

सपना कपूर यांनी शासनाच्या डिजिटल प्रणालींबाबत माहिती देताना विविध विभागांमधील माहिती एकत्रितपणे जोडण्याचे महत्त्व अधोरेखित केले. नागरिकांना अधिक जलद आणि सुरक्षित सेवा देण्यासाठी डिजिटल पायाभूत सुविधा मजबूत करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रवीण दवे यांनी जीपीयू, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक माहिती केंद्रांची कार्यपद्धती याविषयी मार्गदर्शन करताना मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या सीसीटीव्ही चित्रफितींचे तत्काळ विश्लेषण, वाहतूक नियमभंग ओळखणे तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सतर्कता प्रणालींचा वापर याबाबत सोदाहरण माहिती दिली. केंद्रीय प्रक्रिया युनिट आणि जीपीयू यांतील फरक तसेच समांतर प्रक्रिया प्रणालीचे महत्व त्यांनी स्पष्ट केले.

‘सर्वम एआय’च्या प्रात्यक्षिकातून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने शासकीय सेवा अधिक प्रभावी आणि कार्यक्षम पद्धतीने कशा देता येऊ शकतात, याची माहिती उपस्थितांना देण्यात आली.

0000

राजू धोत्रे/विसंअ

 


Join WhatsApp