Pune | Thu, 15 January 2026

No Ad Available

भयातून विकासाकडे गडचिरोलीची वाटचाल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Admin | 15 views
भयातून विकासाकडे गडचिरोलीची वाटचाल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गडचिरोली, (जिमाका) दि.27 – गडचिरोली पोलीस दलाने गेल्या काही वर्षांत दाखविलेल्या शौर्यामुळे आज गडचिरोलीत भयाचे नव्हे तर विकासाचे, जनतेचे आणि संविधानाचे राज्य प्रस्थापित झाले आहे. या परिवर्तनाची साक्ष म्हणून गडचिरोली महोत्सव सुरू झाला असून, तो जिल्ह्यातील नागरिकांसाठी हक्काचा, अभिव्यक्तीचा आणि सहभागाचा मंच ठरत आहे. कला, क्रीडा, लोकप्रबोधन, नृत्य, गायन आणि मनोरंजन यांच्या माध्यमातून समाजजागृती व सांस्कृतिक एकात्मता साधली जात असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
गडचिरोली पोलीस विभागाच्या पुढाकाराने आयोजित गडचिरोली महोत्सव या सांस्कृतिक कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल, गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार, खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) छेरींग दोरजे, नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, तसेच लॉयड्स मेटल्स अ‍ॅण्ड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बालसुब्रमण्यम प्रभाकरन यांची प्रमुख उपस्थिती होती.
 मुख्यमंत्री फडणवीस यांनी गडचिरोली पोलीस दलाने एकीकडे माओवादाविरोधात निर्णायक लढा देत जिल्ह्याला जवळपास पूर्णपणे मुक्त केले, तर दुसरीकडे लोकाभिमुखतेतून महसूल प्रशासनासोबत समन्वय साधत राज्य शासनाच्या विविध योजना जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवल्या, असे  सांगितले.
“आज गडचिरोली जिल्ह्याने भरारी घेतली आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार, उद्योग, पर्यावरण अशा प्रत्येक क्षेत्रात जिल्ह्याची झपाट्याने प्रगती होत आहे. पुढील दहा वर्षांत गडचिरोली महाराष्ट्रातील पहिल्या पाच जिल्ह्यांत असेल,” असा विश्वास व्यक्त करत, आगामी काळात दक्षिण भारताचे प्रवेशद्वार म्हणून गडचिरोलीला विकसित करण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
यावेळी सांस्कृती कार्यक्रमात विजेत्यात स्पर्धकांना मुख्यमंत्री यांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पोलिस अधिक्षक श्री निलोत्पन यांनी केले.
यावेळी विविध लोकप्रतिनिधी, अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
००००

Join WhatsApp