Pune | Thu, 15 January 2026

No Ad Available

छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश प्राधिकरणास अर्बन रिसर्च फाउंडेशन–सेफटीपिन यांचे सादरीकरण

Admin | 13 views
छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश प्राधिकरणास अर्बन रिसर्च फाउंडेशन–सेफटीपिन यांचे सादरीकरण

छत्रपती संभाजीनगर दि. ७ : छत्रपती संभाजीनगरस्थित अर्बन रिसर्च फाउंडेशन आणि दिल्लीस्थित सेफटीपिन या संस्थांनी छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश प्राधिकरणाला (CSMRDA) महिलांचा आर्थिक सहभाग वाढविण्यासाठी एक अभिनव प्रकल्प प्रस्तावित केला आहे. महानगर प्रदेशात आगामी काळात होणाऱ्या औद्योगिक व शहरी विकासामध्ये महिलांचा सक्रीय सहभाग सुनिश्चित करण्यावर या प्रकल्पाचा भर आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयात याबाबत सादरीकरण करण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, महानगर नियोजनकार हर्षल बाविस्कर, तहसीलदार सुनंदा पारवे, साधना बांगर आदी उपस्थित होते.

अर्बन रिसर्च फाउंडेशन ही टियर–२ आणि टियर–३ शहरांवर कार्य करणारी अग्रणी संस्था असून, सेफटीपिन ही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक प्राप्त संस्था आहे. महानगर प्रदेशात येऊ घातलेल्या टोयोटा किर्लोस्कर, अथर यांसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांमुळे निर्माण होणाऱ्या संधींमध्ये महिलांचा सहभाग कसा वाढविता येईल, तसेच त्याचा महाराष्ट्र व जिल्ह्याच्या आर्थिक उन्नतीस कसा हातभार लागेल, याबाबत सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली.

प्रस्तावित प्रकल्पामध्ये व्हिजन डॉक्युमेंट, प्रादेशिक विकास आराखडा (Regional Plan) यांसारख्या भविष्यातील नियोजन प्रक्रियांमध्ये लिंगभाव-संवेदनशील (Gender Sensitive) नियोजन दृष्टिकोनाचा समावेश करण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्राच्या चौथ्या महिला धोरणासह विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय धोरणांमधून लिंगभावाचा अंतर्भाव कसा होत आहे व त्याचे महत्त्व काय आहे, याची माहिती प्रतिनिधींनी विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांना दिली.

हा प्रकल्प राबविल्यास छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश प्राधिकरण देशात पहिले/अग्रणी प्राधिकरण ठरणार आहे.  त्यातून होणारे सामाजिक व आर्थिक फायदेही सादरीकरणातून स्पष्ट करण्यात आले. प्रस्तावित उपक्रमांतर्गत डेटा संकलन व विश्लेषण, क्षमता निर्माण कार्यशाळा, उद्योगांशी संवाद, तसेच अंतिम कृती आराखडा यांचा समावेश राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

विभागीय आयुक्त पापळकर यांनी या सादरीकरणाचे कौतुक करून केले.  शहरी भागातील महिलांच्या गरजांबरोबरच प्राधिकरण क्षेत्रातील ग्रामीण भागातील महिलांच्या आकांक्षा व गरजांचा समावेश करण्याची सूचना केली. या संदर्भात सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

*****


Join WhatsApp