
मुंबई, दि. ८ : महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधवराव गाडगीळ यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधवराव गाडगीळ यांच्या निधनाचे वृत्त समजून दुःख झाले. पर्यावरण संतुलन, संरक्षण व जैवविविधतेचे जतन या कार्यासाठी आयुष्य वेचलेले डॉ. गाडगीळ हे आधुनिक काळातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व होते. आज जगात पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना त्यांनी सातत्याने विद्यार्थी, युवक तसेच इतर सर्व वर्गांमध्ये पर्यावरण रक्षणाबाबत जनजागृती केली. त्यांचे कार्य पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे.
