Pune | Wed, 17 June 2026

No Ad Available

दुर्गम भागातील ७ आरोग्य योद्ध्यांचा राज्यस्तरीय सन्मान

Admin | 5 views
दुर्गम भागातील ७ आरोग्य योद्ध्यांचा राज्यस्तरीय सन्मान

मुंबई, दि. १७ : नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा व धडगाव या अतिदुर्गम आदिवासी भागांमध्ये प्रतिकूल परिस्थितीत कार्यरत राहून आरोग्य सेवेचा दीप अखंड तेवत ठेवणाऱ्या सात आरोग्य योद्ध्यांचा सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि प्रशस्तीपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

आरोग्य भवन, मुंबई येथे आयोजित आढावा बैठकीदरम्यान दुर्गम भागातील आरोग्य सेवेची वस्तुस्थिती समोर आणणाऱ्या आणि आपल्या कार्यातून उल्लेखनीय परिणाम साधणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. बैठकीस आमदार चित्रा वाघ, आरोग्य आयुक्त डॉ. सुनिल भोकरे, संचालक डॉ. विजय कंदेवाड, आरोग्य विभागातील इतर वरिष्ठ अधिकारी, उपसंचालक डॉ.कपिल अहेर, नंदुरबार जिल्ह्यातील वरिष्ठ आरोग्य अधिकारी तसेच अक्कलकुवा व धडगाव येथील आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या सन्मानाचा उद्देश दुर्गम भागात कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावणे, त्यांच्या कार्याला सार्वजनिक मान्यता मिळवून देणे आणि इतर कर्मचाऱ्यांनाही प्रेरणा देणे हा आहे.

सन्मानित अधिकारी व कर्मचारी :

१. डॉ. गुणवंत कांबळे, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय मोलगी

२. डॉ. कांतीलाल पावरा, तालुका आरोग्य अधिकारी, धडगाव

३. डॉ. संतोष परमार, स्त्रीरोग तज्ज्ञ, ग्रामीण रुग्णालय धडगाव

४. डॉ. राहुल नायका, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र मांडवा

५. डॉ. हिमांशू चव्हाण, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र रोषमाळ खुर्द

६. चमेली भताने, अधिपरिचारिका, प्राथमिक आरोग्य केंद्र डाब

७. अंजना परमार, आरोग्य सेविका, तरंगता दवाखाना (बोट अॅम्ब्युलन्स), धडगाव

माता व बाल आरोग्यासाठी उल्लेखनीय योगदान

डॉ. गुणवंत कांबळे यांनी २०१४ पासून दुर्गम व आदिवासी भागात सेवा बजावताना माता व बाल आरोग्य क्षेत्रात विशेष कार्य केले आहे. प्रसूती व स्त्रीरोग विषयातील पदव्युत्तर पदविका प्राप्त केल्यानंतर त्यांनी नंदुरबार जिल्हा महिला व बालरुग्णालयात तसेच ग्रामीण रुग्णालय मोलगी येथे उच्च जोखमीच्या गर्भवती मातांना तज्ज्ञ सेवा उपलब्ध करून दिल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण रुग्णालय मोलगी येथे उच्च जोखमीच्या प्रसूतींची संख्या ७४० वरून ९८० पर्यंत वाढली असून संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण सुमारे ३० टक्क्यांनी वाढले आहे. परिणामी घरगुती प्रसूती कमी होऊन माता मृत्यू कमी करण्यास मोठी मदत झाली आहे.

“रस्ते दुर्गम असले तरी सेवेचा मार्ग सुकर”

प्राथमिक आरोग्य केंद्र मांडवा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल नायका यांनी गेल्या पाच वर्षांत माता मृत्यूदर कमी करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहेत. आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी आणि ग्रामस्थांच्या सहभागातून संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण वाढविण्यात त्यांना यश आले असून मागील दोन वर्षांत त्यांच्या कार्यक्षेत्रात एकही माता मृत्यू होऊ दिलेला नाही. दुर्गम भागातील नागरिकांचा आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास दृढ करण्यात त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.

कुपोषण, सिकलसेल आणि आपत्कालीन सेवेत विशेष कार्य

प्राथमिक आरोग्य केंद्र रोषमाळ खुर्द येथील डॉ. हिमांशू चव्हाण यांनी कुपोषण कमी करणे, सिकलसेलग्रस्त रुग्णांचे समुपदेशन व उपचार, उच्च जोखमीच्या गर्भवती मातांचे व्यवस्थापन तसेच असंसर्गजन्य आजारांवरील उपचार यामध्ये विशेष कामगिरी केली आहे. मागील दोन वर्षांत ४० हून अधिक सर्पदंश आणि १५ हून अधिक विंचूदंश रुग्णांचे प्राण वाचविण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसेच अतिदुर्गम भागात जाऊन वैद्यकीय व न्यायवैद्यक सेवाही प्रभावीपणे दिल्या आहेत.

दुर्गम आदिवासी भागातील मातृआरोग्य सेवेसाठी दोन दशकांची समर्पित सेवा

ग्रामीण रुग्णालय धडगाव येथील स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ डॉ. संतोष नथमल परमार हे सन २००४ पासून शासकीय आरोग्य सेवेत कार्यरत असून गेल्या दोन दशकांहून अधिक काळ त्यांनी दुर्गम आदिवासी भागातील माता व बाल आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण रुग्णालय धडगाव येथे दरमहा सुमारे १५० ते २०० संस्थात्मक प्रसूतींचे यशस्वी व्यवस्थापन केले जाते.

आदिवासी भागातील आरोग्य सेवेचे प्रभावी नेतृत्व

धडगावचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कांतीलाल शिवाजी पावरा हे मागील २३ वर्षांपासून आदिवासी व अतिदुर्गम भागात सेवा बजावत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली धडगाव तालुक्यात संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण वाढले असून माता मृत्यूदरात लक्षणीय घट झाली आहे. मानव विकास अभियान, १०२ रुग्णवाहिका सेवा, आशा स्वयंसेविकांचे सक्षमीकरण आणि उच्च जोखमीच्या गर्भवतींचे प्रभावी व्यवस्थापन यामुळे माता-बाल आरोग्य सेवांना बळकटी मिळाली आहे.

कुटुंब नियोजन कार्यक्रमांतर्गत पुरुष नसबंदी मोहिमेत उद्दिष्टाच्या २०० टक्क्यांहून अधिक कामगिरी करून धडगाव तालुक्याने राज्यात अग्रक्रम मिळविला आहे.

सेवाभावाची प्रेरणादायी कहाणी

प्राथमिक आरोग्य केंद्र डाब येथील अधिपरिचारिका चमेली भताने या गेल्या नऊ वर्षांपासून मुख्यालयी वास्तव्यास राहून रात्रंदिवस सेवा बजावत आहेत. त्यांनी आतापर्यंत ९८५ संस्थात्मक प्रसूती यशस्वीपणे हाताळल्या असून प्रसूती सेवा, आपत्कालीन सेवा आणि रुग्णसेवेमध्ये त्यांचे योगदान विशेष आहे. दुर्गम भागातील महिलांना सुरक्षित मातृत्वाचा आधार देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.

नर्मदेच्या लाटांवर आरोग्य सेवेची जीवनदायिनी

धडगाव तालुक्यातील नर्मदा नदीकाठच्या दुर्गम वस्त्यांमध्ये कार्यरत असलेल्या तरंगत्या दवाखान्याच्या आरोग्य सेविका अंजना परमार यांचे कार्य विशेष प्रेरणादायी आहे. रस्ते नसलेल्या आणि अनेकदा केवळ जलमार्गानेच पोहोचता येणाऱ्या गावांमध्ये त्या बोट अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून नियमित आरोग्य सेवा पोहोचवितात.

गर्भवती माता, नवजात बालके, लसीकरणासाठी पात्र बालके, सिकलसेल रुग्ण आणि वृद्ध नागरिक यांच्यापर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्या करीत आहेत. पावसाळ्यात नदीला पूर आलेला असतानाही जीव धोक्यात घालून दुर्गम वस्त्यांमध्ये आरोग्य तपासणी, औषध वितरण, समुपदेशन आणि रेफरल सेवा देण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे. अनेक गंभीर रुग्णांना वेळेत उपचारासाठी स्थलांतरित करून जीव वाचविण्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.

दुर्गम भागातील कर्मचाऱ्यांना प्रेरणा

यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, “दुर्गम भागात सेवा देणारे आरोग्य कर्मचारी हे आरोग्य व्यवस्थेचे खरे आधारस्तंभ आहेत. अनेक अडचणी, प्रतिकूल परिस्थिती आणि मर्यादित साधनसामग्री असूनही ते नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवत आहेत. त्यांचे कार्य केवळ प्रशंसनीय नाही तर संपूर्ण आरोग्य यंत्रणेसाठी प्रेरणादायी आहे. शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.”

या सन्मानामुळे नंदुरबारसह राज्यातील दुर्गम भागात कार्यरत हजारो आरोग्य अधिकारी, कर्मचारी, परिचारिका, आशा स्वयंसेविका आणि समुदाय आरोग्य कर्मचाऱ्यांना नव्या जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

००००

दत्तात्रय कोकरे/विसंअ


Join WhatsApp