
मुंबई, दि. 29 : राज्यातील “मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0’ (एमएसकेव्हीवाय 2.0) अंतर्गत कामे करताना ज्या संस्थांना जागेच्या संदर्भात समस्या आहे, त्यासंदर्भात जागेच्या उपलब्धतेबाबत जिल्हाधिकारी यांना निर्देश देवून सबस्टेशन सुरू करण्यासाठी योग्य ती मदत केली जाईल, असे ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितले.
ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0’ (एमएसकेव्हीवाय 2.0) अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामाचा सविस्तर आढावा घेतला. निविदा प्रक्रियेअंतर्गत निवड झालेल्या संस्थांकडून प्रकल्पाच्या अंमलबजावणीसंबंधी प्रगती, अडचणी आणि उपाययोजना याबाबत त्यांनी सविस्तर आढावा घेतला.
प्रकल्प वेळेत आणि गुणवत्तापूर्ण रीतीने पूर्ण व्हावे, यासाठी महावितरणने नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
राज्यमंत्री बोर्डीकर यांनी प्रत्येक संस्थांच्या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेऊन त्यावर तत्काळ उपाययोजना करण्याची ग्वाही दिली.
आढावा बैठकीस ऊर्जा विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि निविदाधारक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
000
संजय ओरके/विसंअ
