Pune | Thu, 15 January 2026

No Ad Available

हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आरंभता की अरदास कार्यक्रम नांदेड येथे संपन्न

Admin | 13 views
हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आरंभता की अरदास कार्यक्रम नांदेड येथे संपन्न

नांदेड, दि. ३ :“हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आयोजित उपक्रमाचा ‘आरंभता की अरदास’ हा विधी आज नांदेड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावर भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी मुख्य कार्यक्रमाच्या मंडपाचे भूमीपूजन तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वाराचे पंचप्यारे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सिख, सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मीकि, भगत नामदेव संप्रदाय व उदासीन संप्रदाय या समाजातील संतांची उपस्थिती लाभली.

हिंद-दी-चादर कार्यक्रमाचा औपचारिक प्रारंभ तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा अबचलनगर, नांदेडचे मुख्य जथ्थेदार संत बाबा कुलवंत सिंगजी यांच्यासह भाई जोसिंदर सिंगजी, भाई राम सिंगजी, भाई कश्मीर सिंगजी, भाई गुरमीत सिंगजी तसेच गुरुद्वारा लंगर साहिबचे संत बाबा बलविंदर सिंगजी यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी विधान परिषदेचे सदस्य बाबुसिंग महाराज( पोहरादेवी), जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, तहसीलदार संजय वारकड, ३५० वा शहीदी समागम समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, महंत सुनिल महाराज, महंत जितेंद्र महाराज, क्षेत्रीय समिती अध्यक्ष डॉ. विजय सतबीर सिंग, सरजीत सिंग गिल, क्षेत्रीय समितीचे पदाधिकारी, राज्यस्तरीय समितीचे सदस्य उपस्थित होते.


समन्वयक रामेश्वर नाईक म्हणाले की, नांदेड येथे २४ व २५ जानेवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या शहादतीचा गौरवशाली इतिहास समाजासमोर मांडण्यात येणार आहे. अल्पसंख्यांक विकास विभाग आणि नऊ समाजांच्या संयुक्त सहभागातून हा उपक्रम राबविण्यात येत असून, यापूर्वी ७ डिसेंबर रोजी नागपूर येथे हा कार्यक्रम भव्य स्वरूपात संपन्न झाला आहे. त्याच धर्तीवर नांदेडमध्येही हा ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमानंतरही श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचा इतिहास जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी व्यापक जनजागृती केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


यावेळी गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंग यांनी राज्यात नागपूर येथे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला असून नांदेड व नवी मुंबई येथेही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याबद्दल शासनाचे आभार मानले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानाचे स्मरण करण्यात येणार असून गौरवशाली इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, रविवार दि. २५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक नियोजन व पूर्वतयारीला गती देण्यात आली आहे. सुरक्षा, वाहतूक व कार्यक्रमस्थळ व्यवस्थापनाबाबत सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या असून यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात क्षेत्रीय धर्मजागरण समितीचे प्रमुख महेंद्रजी रायचुरा यांच्या उपस्थितीत अशासकीय व शासकीय सदस्यांच्या सोपविलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला.
०००


Join WhatsApp