Pune | Thu, 15 January 2026

No Ad Available

जीवामृत हेच नैसर्गिक शेतीचे ‘अमृत’ – राज्यपाल आचार्य देवव्रत

Admin | 11 views
जीवामृत हेच नैसर्गिक शेतीचे ‘अमृत’ – राज्यपाल आचार्य देवव्रत

नाशिक, दि. २ (जिमाका वृत्तसेवा): रासायनिक खते, कीटकनाशकांच्या अतीवापरामुळे नापीक झालेली जमीन सुपीक करावयाची असेल, तर आपल्याला नैसर्गिक शेतीकडे वळावे लागेल. या शेतीसाठी जीवामृत हेच अमृत आहे, असे सांगत राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी शेतकऱ्यांना त्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.

राज्यपाल श्री. देवव्रत यांनी आज सकाळी पिंपरखेड येथील शेतकरी सुनील घडवजे यांच्या शेतावर जाऊन श्रमदान केले. त्यानंतर तेथेच त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, राज्यपाल यांचे सचिव प्रशांत नारनवरे, आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, सहायक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे, कश्मिरा संख्ये, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त दिनकर पावरा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, आत्माचे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशिद, सरपंच सोनाली मोरे आदी उपस्थित होते.

राज्यपाल श्री. देवव्रत यांनी सांगितले, नैसर्गिक शेतीला प्राधान्य देणे काळाची गरज आहे. या शेतीमुळेच जमीन सुपीक होण्यास मदत होईल. या शेतीचा गावागावात प्रचार आणि प्रसार करावा. याबरोबरच शेतकऱ्यांनी देशी गायींचे पालन करून त्यांचे संवर्धन करावे. त्यांचे पालन नैसर्गिक शेतीला पूरक ठरणारे आहे, असे सांगत त्यांनी जीवामृत तयार करण्याचे प्रात्यक्षिक उपस्थित शेतकऱ्यांना दाखविले.

प्रारंभी राज्यपाल श्री. देवव्रत, मंत्री श्री. झिरवाळ यांनी श्रमदान करीत चाऱ्याची कापणी केली. तो त्यांनी गाय आणि कालवडीला खाऊ घातला. त्यानंतर शेतकऱ्यांकडून त्यांचेकडे असलेल्या गायींची माहिती घेतली. प्रत्येक शेतकऱ्यांने गो पालन करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

 

00000


Join WhatsApp