Pune | Mon, 01 June 2026

No Ad Available

जलसंधारण अधिकाऱ्यांसाठी वाल्मीमध्ये प्रशिक्षण अनिवार्य करणार – मंत्री संजय राठोड

Admin | 14 views
जलसंधारण अधिकाऱ्यांसाठी वाल्मीमध्ये प्रशिक्षण अनिवार्य करणार – मंत्री संजय राठोड

मुंबई, दि. १२ : जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी) येथे मृद व जलसंधारण विभागातील सर्व अधिकाऱ्यांसाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम आणि अभ्यासवर्ग अनिवार्य करण्यात यावेत, अशा सूचना मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिल्या.

मंत्रालयात आयोजित मृद व जलसंधारण विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर यांच्यासह वाल्मीचे अधिकारी तसेच मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री राठोड म्हणाले की, जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी) ही राज्यातील जलसंधारण आणि भूमी व्यवस्थापन क्षेत्रातील महत्त्वाची प्रशिक्षण संस्था असून तिच्या उपलब्ध जागेचे योग्य नियोजन करून अधिक प्रभावीपणे प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात यावेत. क्षेत्रीय पातळीवर कार्यरत अधिकाऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, जलव्यवस्थापन, मृदसंवर्धन आणि विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत नियमित प्रशिक्षण मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रत्येक अधिकाऱ्यांसाठी किमान दहा ते बारा दिवसांचे प्रशिक्षण अनिवार्य करण्यात यावे, तसेच क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांना प्राधान्याने प्रशिक्षण देण्यात यावे, अशा सूचनाही मंत्री राठोड यांनी यावेळी दिल्या.

प्रशिक्षणामुळे अधिकाऱ्यांची कार्यक्षमता वाढून जलसंधारणाच्या योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होईल, तसेच वाल्मी संस्थेच्या परिसराचा सर्वांगीण विकास करून कृषी पर्यटनासारखे उपक्रमही राबविण्यात यावेत, असेही मंत्री राठोड यांनी सांगितले.

००००

राजू धोत्रे/विसंअ

 


Join WhatsApp