Pune | Thu, 15 January 2026

No Ad Available

जपानमधील होक्काईडो प्रांताच्या उपराज्यपालांनी घेतली कौशल्य मंत्री मंगल प्रभात लोढा यांची भेट

Admin | 1 views
जपानमधील होक्काईडो प्रांताच्या उपराज्यपालांनी घेतली कौशल्य मंत्री मंगल प्रभात लोढा यांची भेट

मुंबई, दि. १४ : राज्यातील कौशल्य प्रशिक्षित तरुणांना जपानमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध होणार असून येत्या तीन महिन्यात याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. जपानच्या होक्काईडो प्रांताचे उपराज्यपाल कानो ताकायुकी यांनी मंत्रालयात कौशल्य विकास मंत्री लोढा यांची शिष्टमंडळासह भेट घेतली.

यावेळी कौशल्य प्रशिक्षित मनुष्यबळाची जपानमध्ये मोठी मागणी असल्याच्या पार्श्वभूमीवर रोजगाराच्या संधीबाबत चर्चा करण्यात आली. कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, कौशल्य विकास विभागाचे आयुक्त डॉ. अमित सैनी, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालक माधवी सरदेशमुख, जपानच्या आंतरराष्ट्रीय व्यवहार विभागाचे वरिष्ठ संचालक तोशिनोरी नाईतो, परदेशी मनुष्यबळ विभागाचे संचालक ईजी यामामोटो तसेच आंतरराष्ट्रीय व्यवसाय विभागाचे संचालक माकोतो ताकाहाशी, आंतरराष्ट्रीय व्यवसाय विनिमय विभागाच्या प्रमुख हिरोए मिकामी उपस्थित होते. या बैठकीदरम्यान भाषांतराची जबाबदारी दुभाषी युका इगाराशी यांनी पार पाडली.

होक्काईडो हा जपानच्या उत्तरेकडील प्रांत असून, जपानचा जवळपास २२ टक्के भाग या प्रांताने व्यापला आहे. या प्रांतात कृषी, मत्स्य, उद्योग, बांधकाम आणि पायाभूत सुविधा तसेच नर्सिंग क्षेत्रात मनुष्यबळाची नितांत गरज आहे. त्यानुसार कुशल मनुष्यबळाच्या उपलब्धतेसाठी होक्काईडो प्रांताने आंतरराष्ट्रीय भागीदारीसाठी पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून या प्रांताच्या शिष्टमंडळाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री लोढा यांची भेट घेतली.

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, जागतिक स्तरावर भारतीय मनुष्यबळ क्रियाशील ठेवण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा कौशल्य विकासावर अधिक भर आहे. त्यादृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात राज्यातील कौशल्य विभाग कार्यरत असून विविध देशांमध्ये राज्यातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करण्याच्या दृष्टीने काम सुरु आहे. विद्याविहार येथील स्वामी विवेकानंद कौशल्य विकास प्रबोधनीद्वारे कौशल्य प्रशिक्षण आणि जपानी भाषेचे शिक्षण देण्याचा प्रयत्न असल्याचेही कौशल्य विकास मंत्री लोढा यांनी सांगितले.

जपानमध्ये कृषी, वैद्यकीय, विविध तंत्रज्ञ, बांधकाम आणि सेवा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी आहे. भारतीय युवक अधिक कार्यक्षमतेने काम करत असून भारतीय कौशल्य प्रशिक्षित तरुणांना जगभरात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे होक्काईडो प्रांताचे उपराज्यपाल कानो ताकायुकी यांनी सांगितले.

000

श्रीमती संध्या गरवारे/विसंअ

 


Join WhatsApp