Pune | Thu, 15 January 2026

No Ad Available

कौशल्य विकास प्रशिक्षण योजना

Admin | 40 views
कौशल्य विकास प्रशिक्षण योजना

जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, त्यांचे सर्वांगीण सक्षमीकरण व्हावे, यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता विभागामार्फत विविध उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमांतर्गत प्रशिक्षण पूर्णपणे मोफत दिले जाते आणि १५ ते ४५ वयोगटातील उमेदवारांना यात सहभागी होण्याची संधी उपलब्ध आहे. यातील काही योजनांची माहिती घेऊया….

१) प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान :

कौशल्य विकास व उद्योजकता विभाग राज्यातील युवक व युवतींचे कौशल्य विकासाद्वारे सक्षमीकरण करुन त्यांना मागणी असलेल्या उद्योग सेवा व तत्सम क्षेत्रात रोजगार व स्वयंरोजगारांच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी काम करत आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या स्थानिक विशेष गरजानुसार विशिष्ठ मागणीच्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण दिले जाते. सदर प्रशिक्षणाकरीता शैक्षणिक अर्हता ही प्रत्येक अभ्यासक्रमानुसार वेगवेगळी असू शकते.

१० वी उत्तीर्ण/अनुत्तीर्ण ते पदवीपर्यंतच्या उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ घेता येऊ शकतो.

सदरचे प्रशिक्षण हे तीन ते सहा महिने कालावधीचे (Short Term Courses) असतात.

विविध कोर्सचे कौशल्य प्रशिक्षण जिल्ह्यामध्ये कोठे उपलब्ध होऊ शकेल याची माहिती या विभागाच्या

https://www.mahaswayam.gov.in या शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान राज्यस्तरावर व किमान कौशल्य विकास कार्यक्रम हा जिल्हास्तरावर राबविला जातो.

आजपर्यंत जिल्ह्यातून १०४९५ उमेदवारांनी या अभियानाचा लाभ घेतला आहे.

२) प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास कार्यक्रम :

ग्रामीण भागातून शहराकडे होणाऱ्या स्थलांतराचे प्रमाण कमी करणेसाठी ग्रामीण भागात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी ग्रामीण कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.

जिल्ह्यात एकुण १४ प्रशिक्षण केंद्रे कार्यरत आहेत.

त्याद्वारे आजमितीस एकुण ११ हजार ३० उमेदवारांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला आहे.

३) आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र :

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्येच कौशल्य विकास प्रशिक्षण उपलब्ध व्हावे, याकरीता महाविद्यालयामध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात आली आहेत.

महाविद्यालयीन शिक्षण घेऊन बाहेर पडताना विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण घेता यावे यासाठी आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र स्थापना करण्यात आली आहे.

सदर कौशल्य विकास केंद्रामधून आजमितीस एकुण १ हजार ३७ उमेदवारांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला आहे.

विशेष वैशिष्ट्ये

सर्व उमेदवारांना मोफत कौशल्य प्रशिक्षण.

१५ ते ४५ वयोगटातील पात्र उमेदवारांना प्रशिक्षणाची संधी.

कोर्स पूर्ण झाल्यानंतर रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधींमध्ये लक्षणीय वाढ.

अधिक माहितीसाठी संकेतस्थळ : www.mahaswayam.gov.in

कार्यालय : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग, दूरध्वनी क्रमांक ०२१४१-२२२०२९

  • संकलन, जिल्हा माहिती कार्यालय, रायगड -अलिबाग

Join WhatsApp