Pune | Thu, 15 January 2026

No Ad Available

कराड येथील विमानतळाचा विस्तार व विकासकामांना गती द्या – पालकमंत्री शंभूराज देसाई

Admin | 11 views
कराड येथील विमानतळाचा विस्तार व विकासकामांना गती द्या – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा, दि. ६: कराड विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा निर्माण व्हावी, यासाठी 47 हेक्टर जमीन भूसंपादन करून विमान प्राधिकरणाकडे हस्तांतरण करण्यात आली असून प्राधिकरणाने कराडच्या विमानतळाच्या विस्तार व विकास कामाला गती द्यावी, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

कराड विमानतळ प्राधिकरणाची बैठक पालकमंत्री देसाई यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृह कराड येथे पार पडली. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, कराड नगर परिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, मुख्य वित्तीय  अधिकारी अनीषा गोदाणे, कराड विमानतळाचे व्यवस्थापक कृणाल देसाई यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

कराड विमानतळाची सध्याची धावपट्टी 1 हजार 200 मीटर असून अधिकच्या भूसंपादनामुळे ही धावपट्टी 1 हजार 700 मीटर होणार आहे. प्राधिकरणाने वरिष्ठांशी बोलून कामाची निविदा काढून कार्यारंभ आदेश तयार ठेवावे. या कामासाठी गतीने काम करणारा कॉन्ट्रॅक्टरलाच काम द्यावे. तसेच हे काम गतीने पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत.

भूसंपादन केलेल्या जागेमधून शेती पाणी पुरवठा पाईपलाईन जात आहे. त्यामुळे ही पाईपलाईन काढावी लागणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी देण्यासाठी नवीन पाईपलाईन करायची आहे. याचा सर्व्हे करून जलसंपदा विभागाने निविदा काढून तात्काळ कामाला सुरुवात करावी. या कामाला तत्वतः मान्यता देण्यात आली असून निधीही उपलब्ध आहे.

विमानतळाच्या विस्तार व विकासासाठी उद्योग विभाग निधी देणार आहे. तसेच विमान प्राधिकरणानेही त्यांच्याकडील निधीची तरतूद करून ठेवावी. प्राधिकरणाने टेंडर काढून कार्यारंभ आदेश तयार ठेवावा. शेतीच्या पाणीपुरवठा योजना पूर्ण होताच विमानतळाच्या विस्तारित कामालाही गती द्यावी, असेही निर्देश पालकमंत्री देसाई यांनी दिले.

वाढीव भूसंपादनाची प्रक्रिया तसेच बाधितांच्या पुनर्वसन प्रक्रियेलाही गती द्यावी. कामाच्या प्रगतीचा आढावाही प्रांताधिकारी म्हेत्रे यांना वेळोवेळी देण्याचे निर्देशही पालकमंत्री देसाई यांनी दिले.

०००


Join WhatsApp