Pune | Thu, 15 January 2026

No Ad Available

महानगरपालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारीस मतदान; उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी

Admin | 3 views
महानगरपालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारीस मतदान; उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी

मुंबई, दि. 12 : राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी येत्या 15 जानेवारी 2026 रोजी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यासाठी उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कामगार कर्मचाऱ्यांना या दिवशी सुट्टी किंवा सवलत देणे बंधनकारक करण्यात आल्याचा शासन निर्णय उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने जारी केली आहे.

महानगरपालिका क्षेत्रांतील केंद्र शासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका, शैक्षणिक तत्सम आस्थापनांनाही ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील, असे सामान्य प्रशासन विभागाच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

या शासन निर्णयानुसार निवडणूक क्षेत्रात तसेच क्षेत्राबाहेर कार्यरत असलेल्या सर्व कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानासाठी सुट्टी देण्यात यावी, असे आदेश आस्थापनांना देण्यात आले आहेत. उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने, हॉटेल, निवासस्थाने, आयटी कंपन्या, मॉल्स, शॉपिंग सेंटर्स, किरकोळ विक्रेते आदींना हे आदेश लागू राहणार आहेत.

अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवसाची सुट्टी देणे शक्य नसल्यास किमान तीन तासांची विशेष सशुल्क सवलत देणे बंधनकारक करण्यात आले आहे. या आदेशांचे पालन न केल्यास संबंधित आस्थापना मालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे शासन निर्णयात सूचित करण्यात आले आहे.

सार्वजनिक सुट्टी लागू असलेल्या महानगरपालिकांमध्ये बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण–डोंबिवली, भिवंडी–निजामपूर, मीरा–भाईंदर, वसई–विरार, पनवेल, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, पुणे, पिंपरी–चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली–मिरज–कुपवाड, छत्रपती संभाजीनगर, नांदेड–वाघाळा, परभणी, जालना, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर यांचा समावेश आहे.

००००

राजू धोत्रे/विसंअ


Join WhatsApp