Pune | Thu, 15 January 2026

No Ad Available

महाराष्ट्र भूषण राम सुतार यांना  दिल्लीत भावपूर्ण श्रद्धांजली

Admin | 13 views
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांना  दिल्लीत भावपूर्ण श्रद्धांजली

नवी दिल्ली, २७ – जागतिक ख्यातीचे शिल्पकार महाराष्ट्र भूषण डॉ. राम वंजी सुतार यांना आज येथे झालेल्या सभेत विविध मान्यवरांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी विविध आठवणींच्या माध्यमातून मान्यवरांकडून त्यांच्या जीवनकार्याला उजाळा देण्यात आला.

श्री. सुतार  यांचे गेल्या १८ डिसेंबरला नोएडा येथे  निधन झाले होते. आज त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दिल्लीतील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथील भीम ऑडिटोरियममध्ये  सभा आयोजित करण्यात आली.  सभेत प्रारंभी पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आदी मान्यवरांचे  शोकसंदेश वाचून दाखवण्यात आले. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यावेळी आपल्या भाषणात श्री. सुतार यांच्या बालपणीच्या शिल्पकलेतील रुचीपासून ते ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ आणि मुंबईतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ३५० फूट उंच प्रतिमेच्या निर्मितीपर्यंतच्या कारकीर्दीचा उल्लेख केला. श्री सुतार यांनी घडवलेल्या मूर्ती समाजाला ऊर्जा आणि प्रेरणा देतात. त्यांच्या कलाकृतींच्या माध्यमातून  इतिहासाच्या  जाणिवा जागृत  होतात. त्यांचा वारसा अनिल सुतार यांच्या माध्यमातून पुढे समर्थपणे सांभाळला जाईल, असे ते म्हणाले.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी यावेळी श्रद्धांजलीपर भाषण केले. त्यांनी सांगितले, श्री. राम सुतार यांनी महाराष्ट्राच्या एका छोट्या गावातून आपला जीवनप्रवास सुरू करत आपल्या श्रेष्ठ कलाविष्काराने जागतिक स्तरावर ठसा उमटवला. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’सारख्या महान कलाकृती त्यांच्या सार्थ कर्तृत्वाची साक्ष देतात. विविध महान विभूतींची अचूक शिल्पे साकारणाऱ्या  सुतार यांच्या दीर्घ कलासाधनेचा आणि बहुआयामी प्रतिभेचा गेल्याच महिन्यात महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रभूषण पुरस्कार देऊन गौरव केल्याची स्मृती त्यांनी यावेळी  जागवली.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने संचालक हेमराज बागुल यांनीही श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले, राम सुतार यांचे संपूर्ण आयुष्य कलेला समर्पित होते.  त्यांच्या निधनाने भारतीय कला विश्वाला जागतिक पातळीवर एक गौरवास्पद ओळख मिळवून देणारा एक महान कलावंत हरवला आहे.

श्री. सुतार यांचे पुत्र आणि शिल्पकार अनिल सुतार यांनी वडिलांच्या नम्र जीवनशैली आणि अखंड कार्यमग्नतेच्या विविध  हृदयस्पर्शी आठवणी सांगितल्या. सुतार कुटुंबातील  समीर आणि सोनाली यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली.

या सभेला  सामाजिक, सांस्कृतिक आणि शिल्पकलेच्या क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

००००


Join WhatsApp