Pune | Mon, 01 June 2026

No Ad Available

महसूल विभागाच्या विशेष मोहिमेद्वारे पाणंद रस्ते, सीमांकन मोजणी व जमीन नोंदी व्यवस्थेला गती देणार : मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Admin | 13 views
महसूल विभागाच्या विशेष मोहिमेद्वारे पाणंद रस्ते, सीमांकन मोजणी व जमीन नोंदी व्यवस्थेला गती देणार : मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नाशिक, दि. मे, २०२६ (जिमाका वृत्तसेवा): ग्रामीण भागातील पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करणे, सीमांकन मोजणीची प्रकरणे तातडीने निकाली काढणे तसेच जमीन नोंदी व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी महसूल विभागामार्फत राज्यभर विशेष मोहीम राबवून गती देणार असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे आयोजित शिबिरात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. यावेळी आमदार दिलीप बनकर, पिंपळगाव बसवंत चे नगराध्यक्ष डॉ.मनोज बर्डे, ओझर नगराध्यक्षा अनिता घेगडमल, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सहाय्यक जिल्हाधिकारी पवन दत्ता, उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक महेश इंगळे, तहसीलदार विशाल नाईकवाडे, तहसीलदार (सामान्य शाखा) प्रदीप वर्पे  यांच्यासह नागरिक, लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, पाणंद रस्ते हे ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शेती विकासाचा महत्त्वाचा घटक असून शेतीमाल वाहतूक, सिंचन सुविधा आणि गावातील दळणवळण सुरळीत ठेवण्यासाठी अतिक्रमण हटवून रस्ते कायमस्वरूपी मोकळे ठेवण्यावर भर देण्यात येणार आहे. आवश्यक ठिकाणी सीमांकन मोजणी करून रस्त्यांची रुंदी निश्चित करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. मोजणी विभागावरील वाढता ताण लक्षात घेऊन परवानाधारक खासगी सर्वेअर (लायसन्सी सर्वेअर) यांची मदत घेण्याबाबत सकारात्मक भूमिका शासनाने स्वीकारली असून मोजणीची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यात येणार आहे. ड्रोन सर्वेक्षण, डिजिटल भू-नकाशे आणि ऑनलाइन नोंद प्रणालीद्वारे जमीनविषयक सेवा अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.

जमिनीच्या मालकी हक्कासंदर्भातील वाद कमी करण्यासाठी लॅंड टायटल व्यवस्थेला अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने आवश्यक कायदे व नियमांमध्ये सुधारणा करण्याबाबत शासन स्तरावर कार्यवाही सुरू आहे. ग्रामीण भागातील विकासकामे, रस्ते, सिंचन आणि महसूल विषयक प्रकरणे प्राधान्याने मार्गी लावून नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे, असे निर्देशही मंत्री श्री. बावनकुळे यांनी यावेळी दिले.

शेतकरी हा केंद्रबिंदू मानून  विविध योजनांच्या माध्यमातून शेती अधिक सक्षम आणि शाश्वत करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, नैसर्गिक संकटांचा सामना करतानाही शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे आमदार श्री. बनकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. उपविभागीय अधिकारी डॉ.मंगरुळे यांनी प्रास्ताविकातून महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती यावेळी दिली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला महसूल मंत्री श्री बावनकुळे यांच्या हस्ते विविध महसूल सेवा देणाऱ्या स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले तसेच विविध शासकीय योजनांचे लाभ व दाखल्यांचे वाटप प्रतिनिधी स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

0000000

 

 


Join WhatsApp