Pune | Thu, 15 January 2026

No Ad Available

नगरपालिका हद्दीतही मिळणार घरकुल योजनेचा लाभ; तळा, म्हसळा व माणगाव तालुक्यात घरकुल योजनेस मान्यता – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

Admin | 29 views
नगरपालिका हद्दीतही मिळणार घरकुल योजनेचा लाभ; तळा, म्हसळा व माणगाव तालुक्यात घरकुल योजनेस मान्यता – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

मुंबई, दि. 9 : आदिवासी बांधवांना स्थायी घरकुल देण्यास शासनाचे प्राधान्य आहे. शबरी आदिवासी घरकुल योजनेत ग्रामीण भागाबरोबरच आता नगरपालिका हद्दीत राहणाऱ्या पात्र कुटुंबांनाही घरकुल योजनेचा लाभ मिळत आहे. रायगड जिल्ह्यातील तळा, म्हसळा व माणगाव तालुक्यातील आदिवासी बांधवांसाठी घरकुल उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावांना विभागाने तत्त्वतः मान्यता दिली आहे, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिली.

आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात रायगड जिल्ह्यातील तळा व म्हसळा तालुक्यातील गावांना आदिवासी घरकुल योजनेचा लाभ मिळण्याबाबत बैठक झाली. या बैठकीस महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, आदिवासी विकास विभागाचे सहसचिव मच्छिंद्र शेळके उपस्थित होते.

आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके म्हणाले, रायगड जिल्ह्यातील घरकुल योजनेबाबत उद्भवणाऱ्या विविध अडचणी सोडवण्यासाठी संबंधित प्रांत अधिकारी, वन विभागाचे अधिकारी व प्रकल्प अधिकारी यांच्या समवेत पुढील आठवड्यात बैठक घेण्यात येईल. घरकुल योजना राबविताना येणाऱ्या प्रशासकीय, तांत्रिक व कायदेशीर अडचणींचा आढावा घेऊन त्यावर उपाययोजना निश्चित केल्या जातील. जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना वेळेत घरकुलाचा लाभ मिळावा यासाठी समन्वय साधून अंमलबजावणीला गती देण्यात येईल असे डॉ. वुईके यांनी यावेळी स्पष्ट केले.

महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, रायगड जिल्ह्यातील नगरपंचायत भागातील आदिवासी बांधवांसाठी शबरी आदिवासी घरकुल योजनेद्वारे घरकुले उपलब्ध करून देऊन पाणी, वीज, रस्ता या आवश्यक सोयी पुरविण्यावर भर दिला जाणार आहे. या घरकुलबाबत पुढील टप्प्यात प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून निधी वितरण व प्रत्यक्ष बांधकामाला गती देण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

****

शैलजा पाटील/विसंअ/


Join WhatsApp