Pune | Thu, 15 January 2026

No Ad Available

फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांची वाई तालुक्यातील ओझर्डे गावातील स्ट्रॉबेरी शेताला भेट

Admin | 10 views
फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांची वाई तालुक्यातील ओझर्डे गावातील स्ट्रॉबेरी शेताला भेट

सातारा, दि. ६ : फलोत्पादन, रोजगार हमी व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी वाई तालुक्यातील ओझर्डे गावात स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी महादेव कोळी व परशुराम बिराजदार यांच्या शेताला भेट देऊन प्रत्यक्ष स्ट्रॉबेरी शेतीची पाहणी केली. या भेटीदरम्यान मंत्री गोगावले यांनी स्ट्रॉबेरी लागवड पद्धती, रोपवाटिका, उत्पादन क्षमता, बाजारपेठ, खर्च–उत्पन्नाचे गणित तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींबाबत सविस्तर माहिती घेतली.

स्ट्रॉबेरीसारखी उच्च मूल्य पिके शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांनी नमूद केले. फलोत्पादन विभागामार्फत आवश्यक ते सर्व सहकार्य शेतकऱ्यांना दिले जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. ओझर्डे परिसरात स्ट्रॉबेरी लागवड यशस्वी ठरत असल्याचे सांगत, आधुनिक तंत्रज्ञान, ठिबक सिंचन व सुधारित रोपांचा वापर करणाऱ्या तरुण शेतकऱ्यांचे फलोत्पादन मंत्री गोगावले यांनी विशेष कौतुक केले.

महाबळेश्वरसह वाई, कोरेगाव व जावळी तालुक्यांचा परिसर स्ट्रॉबेरी व फलोत्पादनासाठी अत्यंत पोषक असून, स्ट्रॉबेरी, फळबागा तसेच प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी स्मार्ट, पीएमएफई योजनेअंतर्गत प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रसंगी प्रगतीशील शेतकरी सागर फाटक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

०००


Join WhatsApp