Pune | Mon, 01 June 2026

No Ad Available

पोस्ट विभाग हा भारतीय सांस्कृतिक व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Admin | 16 views
पोस्ट विभाग हा भारतीय सांस्कृतिक व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ८ : गरीब-श्रीमंत, जात-धर्म न पाहता पोस्ट विभागाची सेवा देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेली आहे. कारगिल युद्धाच्या काळातही वीर जवानांचे संदेश त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचविणारे पोस्टमन हे मानवी संवेदनांचे वाहक ठरले. पोस्ट विभाग हा केवळ सेवा देणारा विभाग नसून भारतीय सांस्कृतिक व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दळणवळण तसेच ईशान्य क्षेत्र विकास मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते मुंबईतील अंधेरी रेल्वे स्थानक परिसरातील नूतनीकरण करण्यात आलेल्या अत्याधुनिक पोस्ट ऑफिसचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी आमदार अमित साटम, आमदार हारून खान, महाराष्ट्र-गोवा सर्कलचे मुख्य पोस्टमास्तर जनरल अमिताभ सिंह तसेच पोस्टमास्तर जनरल के. अरोरा आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘वारसा आणि विकास’ या विचारातून पोस्ट विभागाने आधार सेवा, बँकिंग सेवा, ऑटोमॅटिक पार्सल सेवा यांसारख्या आधुनिक सेवांचा स्वीकार केला आहे. इंटरनेट, एसएमएस आणि ई-मेलसारख्या आधुनिक संदेशवहन साधनांमुळे पोस्ट विभागासमोर आव्हाने निर्माण झाली. खासगी कुरिअर सेवांमुळे स्पर्धाही वाढली. मात्र प्रधानमंत्री मोदी यांच्या दूरदृष्टीतून पोस्ट विभागाच्या सामर्थ्याला नवी दिशा मिळाली. पोस्ट बँकसारख्या सेवांमुळे विभागाने मोठे परिवर्तन साधले असून या परिवर्तनात केंद्रीय मंत्री शिंदे यांचेही महत्त्वपूर्ण योगदान आहे.

पोस्ट विभागाने महसुलातील वाढीचा दर अडीच टक्क्यांवरून यंदा १६ टक्क्यांपर्यंत नेला असून नव्या स्वरूपात जनतेच्या सेवेत दाखल होताना अनेक नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. पोस्टमन आणि पोस्ट विभागाचे समाजजीवनातील महत्त्व मराठीतील पु. ल. देशपांडे तसेच हिंदी लेखक शरद जोशी यांच्या साहित्यामधूनही अधोरेखित झाले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. सामान्य माणसासाठी पोस्ट विभागाने मोठी कामगिरी बजावली असल्याचेही त्यांनी नमूद केले.

राज्यात ‘जनसेवा कनेक्ट’च्या माध्यमातून २२०० पोस्ट ऑफिस सुरू करण्यात येत असून त्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे त्यांनी आभार मानले.

पोस्ट विभागाने सर्वसामान्यांच्या सेवेला अग्रक्रम दिलाकेंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले की, गाव असो वा शहर, प्रत्येक कुटुंबाच्या मनामध्ये पोस्टमनबद्दल विशेष आत्मीयता आहे. देशातील दीड लाख पोस्ट कार्यालयांमार्फत सेवा देताना पोस्ट विभागाने सर्वसामान्यांच्या सेवेला अग्रक्रम दिला आहे. पोस्ट लाईफ इन्शुरन्समध्ये दीड कोटी खाती आणि जवळपास दोन लाख कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या असून पोस्ट बँकेत ४० कोटी खाती उघडण्यात आली आहेत. या माध्यमातून पोस्ट विभागाने जनतेचा मोठा विश्वास संपादन केला आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळातील ऐतिहासिक वारसा जपत पोस्ट विभागाचे आधुनिकीकरण करण्यात आले असल्याचे सांगताना केंद्रीय मंत्री शिंदे यांनी २००७ साली राज्यमंत्री असताना पोस्टमनच्या मुलांना केंद्रीय विद्यालयांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्न केल्याची आठवण सांगितली. ‘नेक्स्ट जनरेशन पोस्ट ऑफिस’ संकल्पनेतून देशभरात सुमारे १०० पोस्ट ऑफिस सुरू करण्यात आले असून कॅफे, वाय-फाय, इंटरनेट, आरएफआयडी, आधार सुविधा अशा विविध सेवा येथे उपलब्ध करण्यात आल्या आहेत. ‘जनसेवा कनेक्ट’ उपक्रमांतर्गत देशभरात २५ हजार पोस्ट ऑफिस सुरू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

२४ तासांत स्पीड पोस्ट डिलिव्हरी, आरएफआयडी आणि भविष्यवेधी सेवांमुळे खाजगी स्पर्धेतही पोस्ट विभाग सक्षमपणे उभा राहत असून पोस्टमनपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्या परिश्रमातून २०२५-२६ या आर्थिक वर्षात २५०० कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाल्याचेही त्यांनी सांगितले.

‘जन सेवा कनेक्ट’ या उपक्रमांतर्गत विकसित करण्यात आलेल्या या पोस्ट ऑफिसमध्ये आधुनिक पायाभूत सुविधा, सुधारित ग्राहक सेवा तसेच अत्याधुनिक डिजिटल सेवा प्रणालीची उभारणी करण्यात आली आहे. १९३२-३३ मध्ये स्थापन झालेल्या अंधेरी आर.एस. पोस्ट ऑफिसला आधुनिक तंत्रज्ञान, कार्यक्षम सेवा व्यवस्था आणि नागरिकाभिमुख दृष्टिकोन लक्षात घेऊन नव्याने विकसित करण्यात आले आहे.

पारंपरिक पोस्ट ऑफिसचे रूपांतर आधुनिक, तंत्रज्ञानाधारित आणि नागरिककेंद्रित सेवा केंद्रांमध्ये करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

 

कार्यक्रमादरम्यान अंधेरी आर.एस. पोस्ट ऑफिस परिसरात लोकार्पण, स्मृतिफलक अनावरण, तसेच आधार सेवा केंद्राची पाहणी करण्यात आली . त्यानंतर आयोजित मुख्य कार्यक्रमात विशेष दृकश्राव्य सादरीकरण तसेच ‘जन सेवा कनेक्ट’ उपक्रमावरील विशेष पोस्टल कव्हरचे प्रकाशन करण्यात आले.

0000

किरण वाघ/विसंअ



Join WhatsApp