Pune | Thu, 15 January 2026

No Ad Available

पर्यावरण संरक्षणाला विज्ञानाची, लोकसहभागाची जोड देणारे समर्पित व्यक्तिमत्त्व हरपले

Admin | 9 views
पर्यावरण संरक्षणाला विज्ञानाची, लोकसहभागाची जोड देणारे समर्पित व्यक्तिमत्त्व हरपले

मुंबई, दि. ८ :- ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ.माधव गाडगीळ यांच्या निधनामुळे पर्यावरण संरक्षण चळवळीची मोठी हानी झाली असून पर्यावरण संरक्षणाला विज्ञानाची, लोकसहभागाची जोड देणारे समर्पित व्यक्तिमत्त्व हरपले, या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत डॉ. गाडगीळ यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, विकास आणि पर्यावरण यांचा समतोल कसा साधावा, याचा वस्तुपाठ डॉ. गाडगीळ यांनी घालून दिला होता. निसर्ग हा केवळ पाहण्याची वस्तू नाही, तर तो आपल्या अस्तित्वाचा आधार आहे असे त्यांचे म्हणणे होते. पर्यावरणविषयक सार्वजनिक धोरणांवर त्यांचा मोठा प्रभाव होता. ते शाश्वत विकासाचे खंदे पुरस्कर्ते होते. पश्चिम घाटाच्या संरक्षणासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले. त्यांनी पारंपरिक ज्ञान प्रणालींना आधुनिक विज्ञानाशी जोडण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे पर्यावरण संरक्षणात लोकांचा सहभाग घेण्यात त्यांना यश मिळाले. निसर्ग वाचवायचा असेल तर तिथल्या स्थानिक माणसाला सोबत घेतले पाहिजे, हा त्यांचा आग्रह होता. जल, जंगल आणि जमीन यावर स्थानिक लोकांचा अधिकार असावा, असे ते मानत. ​खाणकाम, मोठी बांधकामे आणि जलवायू बदल यांसारख्या धोक्यांविरुद्ध लढणारा एक प्रमुख आवाज हरवला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. गाडगीळ यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

00000


Join WhatsApp