Pune | Thu, 15 January 2026

No Ad Available

पर्यटन वृद्धीसाठी महिला केंद्रीत ‘आई’ धोरण  

Admin | 13 views
पर्यटन वृद्धीसाठी महिला केंद्रीत ‘आई’ धोरण  

पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद्योजकता आणि नेतृत्वगुण विकसित करण्याच्या हेतूने  शासानाच्या पर्यटन विभागामार्फत शासन निर्णयाद्वारे महिला सक्षमीकरणासाठी  आई महिला केंद्रीत/ लिंग समावेशक पर्यटन धोरण जाहीर केले आहे.

महिला उद्योजकता विकास, महिलांकरिता पायाभूत  सुविधा, महिला पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य, महिला पर्यटकांसाठी कस्टमाईज्ड उत्पादने/ सवलती , प्रवास आण‍ि पर्यटन विकास ही महिलांसाठीच्या पर्यटन धोरणाची पंचसूत्री आहे.

या पर्यटन धोरणांतर्गत महिलांना पर्यटन क्षेत्रात व्यवसाय उभारणीसाठी किंवा पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या पर्यटन व्यवसायाकरीता रूपये 15 लाखापर्यतच्या मर्यादेत कर्ज दिले जाते. मंजूर कर्जाचा हप्ता वेळेत भरल्यास त्यातील व्याजाची रक्कम (12 टक्क्याच्या मर्यादेत) कर्ज परतफेड किंवा 7 वर्षे कालावाधीपर्यंत किंवा व्याजाची रक्कम रूपये 4.50 लाख मर्यादेपर्यंत जे आधी घडेल तोपर्यंत व्याजाचा परतावा पर्यटन संचालनालय व्याज परतावा स्वरूपात खालील अटींच्या अधीन राहून अदा करेल.

अशा आहेत अटी
1. पर्यटन व्यवसाय पर्यटन संचलानालयाकडे नोंदणीकृत असावा.
2. पर्यटन व्यवसाय महिलांच्या मालकीचा व त्यांनी चालविलेला असणे आवश्यक
3. महिलांच्या मालकीच्या व्यवसायामध्ये 50 टक्के व्यवस्थापकीय व इतर कर्मचारी महिला असणे आवश्यक आहे.
4. पर्यटन व्यवसायाकरीता आवश्यक सर्व परवानग्या प्राप्त असाव्यात.
5. लाभार्थ्यांचे कर्ज खाते आधार लिंक असावे.
6. कर्जाचे हप्ते वेळेत भरले पाहिजेत.
7. लाभार्थी, पर्यटन व्यवसाय व कर्ज देणारी बँक ही महाराष्ट्रात स्थित असणे आवश्यक आहे.

41 प्रकारचे पर्यटन व्यवसाय
पर्यटन क्षेत्राशी निगडित असलेले 41 प्रकारचे व्यवसाय, उद्योग सुरू करण्यासाठी पर्यटन विभाग महिलांना 15 लाख रूपयापर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार आहे. यात व्यवसायात कॅरॅव्हॅन, साहसी पर्यटन (जमीन, हवा, जल), पर्यटक सुविधा केंद्र, कृषी पर्यटन केंद्र, बी ॲण्ड बी, रिसॉर्ट, हॉटेल, मोटेल, टेन्ट, ट्री हाऊस, व्होकेशनल हाऊस, पर्यटन व्हिला, वूडन
कॉटेजेस, महिला चलित कॉमन किचन, टुरिस्ट ट्रान्सपोर्ट ऑपरेटर, मेडिकल टुरिझम व इतर पर्यटन व्यवसाय अशा 41 प्रकारच्या पर्यटन व्यवसायांचा समावेश आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रे
अर्ज सादर करताना अर्जदाराने  www.grass.mahakosh.gov.in  या  संकेतस्थळावर  रूपये 50  प्रक्रिया शुल्क भरून पावती अर्जासोबत जोडावी. व्यवसाय महिलेच्या मालकी हक्काचा असल्याचे रूपये 100 च्या स्टॅम्प पेपरवर नेाटरीद्वारे साक्षांकित प्रतिज्ञापत्र आवश्यक आहे.

अर्जदाराचा पासपोर्ट फोटो, ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड/ पासपोर्ट/ ड्राइव्हिंग परवाना/ मतदार ओळखपत्र  यापैकी एक, स्वत:चे आधारकार्ड, पॅनकार्ड आधार लिंक पासबुकची छायांकित प्रत, रद्द केलेला धनादेश आवश्यक आहे. पर्यटन व्यवसायाच्या  पत्त्याचा पुरावा (उद्योग नोंदणी/ वीज देयक/ लॅण्डलाईन टेलिफोन देयक/ दुकान आणि स्थापना पारवाने इ.) आवश्यक आहे. पर्यटन केंद्र/व्यवसाय/उद्योगांची मालकी दस्तावेज, महिला अर्जदाराच्या नावावरील 7/12 उतारा / प्रॉपर्टी कार्ड, 8-अ नमुना किंवा नोंदणीकृत भाडेकरार, अन्न व औषध प्रशासान परवाना अनिवार्य आहे. पर्यटन व्यवसायाठी आवश्यक असलेली कोणतीही नोंदणी/ परवाना/ कागदपत्रे उदा. निधी पोर्टल नोंदणी, पर्यटन संचालनालय नोंदणी, पर्यटन विकास महामंडळाकडे नोंदणी प्रमाणपत्र प्रत आवश्यक. प्रकल्प संकल्पना संक्षिप्त माहिती 500 शब्दात, उद्योग आधार (पर्यायी), जीएसटी क्रमांक (पर्यायी), महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना नोंदणी प्रमाणपत्र (पर्यायी) इत्यादी आवश्यक आहेत.

विहित नमुन्यातील अर्ज व कागदपत्रे योग्य आढळून आल्यानंतर पर्यटन संचलानालयाकडून सशर्त हेतू पत्र (Letter of Intent) देण्यात येते.

पर्यटन विभागाच्या कर्ज परताव्याच्या अटी व शर्ती
1. पर्यटन संचालनालयाकडून प्राप्त सशर्त हेतू पत्राच्या आधारक लाभार्थ्याने बँकेकडून कर्ज मंजूर करून घ्यावे
2. अर्जदार महिलेने नियमित कर्ज  परतफेड करणे आवश्यक असून हप्ता भरल्यानंतर व्याजाची रक्कम (१२ टक्के मर्यादेत) आधार लिंक खात्यात पर्यटन संचालनालयामार्फत जमा करण्यात येईल.
3. पर्यटन व्यवसाय सुरू असल्याचे छायाचित्रे सादर करावेत
4. व्याजाच्या रकमेव्यतिरिक्त इतर कोणतेही शुल्क/फी अदा केली जाणार नाही
5. कर्ज देणारी बँक ही महाराष्ट्रात स्थित असणे आवश्यक,  बँक सीबीएस (Core banking system) प्रणालीयुक्त असावी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांतर्गत कार्यरत असावी.
6. कर्ज घेताना क्रेडिट गॅरंटी स्किममध्ये सहभागी होणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी पर्यटन संचालनलायाच्या उपसंचालक, नाशिक कार्यालयाचा संपर्काचा पत्ता
उपसंचालक कार्यालय, पर्यटन भवन, शासकीय विश्राम गृह आवार, गोल्फ क्लब मैदान नाशिक. दूरध्वनी क्रमांक 0253-2995464/ 9607527763 ईमेल – ddtourism.nashik-mh@gov.in
00000


Join WhatsApp