Pune | Mon, 01 June 2026

No Ad Available

पुणे जिल्हा नियोजन बैठकीत मंत्री चंद्रकांत पाटील यांचा ऑनलाईन सहभाग, दुर्गम भागातील विद्यार्थिनींसाठी विशेष बससेवा सुरू करण्याची सूचना

Admin | 11 views
पुणे जिल्हा नियोजन बैठकीत मंत्री चंद्रकांत पाटील यांचा ऑनलाईन सहभाग, दुर्गम भागातील विद्यार्थिनींसाठी विशेष बससेवा सुरू करण्याची सूचना

पुणे, दि. १५: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत कोथरुड येथील निवासस्थानावरून ऑनलाईन पद्धतीने सहभाग नोंदवला. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, वेळेची बचत आणि अनावश्यक प्रशासकीय खर्च टाळण्याच्या उद्देशाने ऑनलाईन प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी होत मंत्री पाटील यांनी काटकसरीचा संदेश दिला. बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील विविध विकासकामे, कायदा व सुव्यवस्था तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या.

नसरापूर येथील नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी घटनेची गंभीर दखल घेत दुर्गम भागातील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी ‘सीएसआर’ निधीतून विशेष बससेवा सुरू करण्याची सूचना त्यांनी केली. तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पोलीस विभागाने व्यापक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.

रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच संशयित विकृत मानसिकतेच्या व्यक्तींवर कायद्यानुसार प्रतिबंधात्मक कारवाई करण्याबाबत पोलीस प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा, असे निर्देश त्यांनी दिले. जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी संरक्षक भिंती उभारण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.

महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र ‘बचत गट मॉल’ उभारण्यात यावा, अशी सूचनाही त्यांनी केली. तसेच प्रत्येक गावात सुसज्ज स्मशानभूमी उभारण्यावर भर देण्यात यावा, असेही त्यांनी नमूद केले.

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ऑनलाईन सहभागातून शासकीय संसाधनांचा योग्य व काटकसरीने वापर करण्याचा सकारात्मक संदेश मिळाल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.

००००


Join WhatsApp