Pune | Thu, 15 January 2026

No Ad Available

पुण्यातील नॅन्सी होम प्रकल्पास विभागीय आयुक्तांनी भेट देऊन तातडीने अहवाल सादर करावा – विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

Admin | 10 views
पुण्यातील नॅन्सी होम प्रकल्पास विभागीय आयुक्तांनी भेट देऊन तातडीने अहवाल सादर करावा – विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

मुंबई, दि. 29 :- पुणे येथील नॅन्सी लेक होम प्रकल्पाला 2004 नंतर आतापर्यंत जवळपास 10 वेळा सुधारित मान्यता देण्यात आली असून गाव नकाशा आणि मोजणी नकाशामध्ये सर्व्हे क्र.8 आणि 9 च्या स्थानांमध्ये फेरबदल केले गेल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. यासंदर्भात विभागीय आयुक्त, पुणे यांनी भूमी अभिलेख विभागासह सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन स्थळभेट द्यावी आणि सखोल चौकशी करुन 15 दिवसांच्या आत अहवाल सादर करावा, असे निर्देश महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिले.

विधान भवन, मुंबई येथे सभापती राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नॅन्सी लेक होम सर्व्हे नं.8, कात्रज, पुणे येथे विकासकाने बेकायदेशीर बांधकाम प्रकल्प केल्यासंदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

या प्रकल्पासंदर्भात जिल्हाधिकारी, पुणे यांनी बिगरशेती आदेशामध्ये 37,973.20 चौ.मी. क्षेत्रफळासाठी बांधकाम परवानगी दिलेली असताना प्रत्यक्षात 60,630.59 चौ.मी. क्षेत्रफळावर बांधकाम करण्यात आले आहे किंवा कसे, वारंवार नकाशात बदल करण्याची कारणे काय आहेत, असे प्रश्न या बैठकीप्रसंगी उपस्थित करण्यात आले. याबाबत संबंधित अधिकारी यांच्याकडून समाधानकारक खुलासा होऊ न शकल्याने सभापती प्रा.राम शिंदे यांनी विभागीय आयुक्त, पुणे यांना यासंदर्भात स्थळभेट देऊन चौकशी करुन 15 दिवसांच्या आत अहवाल देण्याबाबतचे निर्देश दिले.

याप्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (4) शिवदर्शन साठ्ये, उप सचिव मोहन काकड, नगरविकास विभागाच्या सह सचिव प्रियांका छापवाले, कार्यकारी अभियंता, पुणे महापालिका रमेश काकडे, उप अभियंता रुपाली ढगे, सहाय्यक विधि अधिकारी निलेश बडगुजर, नगर भूमापन अधिकारी, बाळासाहेब भोसले उपस्थित होते.

००००

राजू धोत्रे/विसंअ

 


Join WhatsApp