Pune | Thu, 15 January 2026

No Ad Available

राज्य क्रीडा दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा अधिकारी रश्मी आंबेडकर यांचे आवाहन

Admin | 8 views
राज्य क्रीडा दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा अधिकारी रश्मी आंबेडकर यांचे आवाहन

मुंबई, दि. ८ : ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन १५ जानेवारी राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या अनुषंगाने १२ ते १५ जानेवारी २०२६ या कालावधीत राज्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये विविध क्रीडाविषयक उपक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन क्रीडा विभागातर्फे करण्यात आले आहे.

ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करणे तसेच नवोदित खेळाडूंना दर्जेदार कामगिरी करण्यासाठी प्रेरणा व प्रोत्साहन देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. याअंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यात १२ ते १५ जानेवारी २०२६ या कालावधीत शाळा व महाविद्यालयांमध्ये पुढील उपक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या उपक्रमांतर्गत ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांची जीवनगाथा व क्रीडा क्षेत्रातील त्यांचे योगदान याविषयी व्याख्याने, क्रीडा संस्कृतीचे जतन व संवर्धनासाठी रॅली, मॅरेथॉन स्पर्धा, शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध खेळांवरील नियमावली, ऑलिम्पिक स्पर्धांसह अन्य महत्त्वाच्या स्पर्धांबाबत माहिती देणारी मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात यावीत. तसेच ऑनलाईन माध्यमातून नामवंत खेळाडूंशी विद्यार्थ्यांचा संवाद, विविध खेळांचे प्रदर्शनीय सामने, विजेत्यांना पुरस्कार वितरण तसेच आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंचा गौरव करण्यात यावा.

राज्य क्रीडा दिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमांच्या ठिकाणी जिल्हा क्रीडा कार्यालयाचा बॅनर लावणे अत्यावश्यक व अनिवार्य राहील.

या सर्व उपक्रमांचा सविस्तर अहवाल Instagram Reel, YouTube ध्वनिफित स्वरूपात तयार करून dsomumbaisub@gmail.com या ई-मेल आयडीवर पाठविण्यात यावा.

उत्कृष्ट नियोजन व प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या प्रथम तीन क्रमांकांच्या संस्थांना अनुक्रमे ₹१०,०००, ₹७,००० व ₹५,००० रोख पारितोषिक, गौरवपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, असे आवाहन मुंबई उपनगरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी रश्मी आंबेडकर यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

0000

 


Join WhatsApp