
नाशिक, दि. १ (जिमाका वृत्तसेवा) : राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज रात्री दिंडोरी तालुक्यातील पिंपरखेड येथील मारुती मंदिराजवळील चावडीवर ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांना वृक्षारोपण, स्वच्छता, नैसर्गिक शेती, गो पालनाचे महत्त्व सांगितले.
यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भगरे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड, राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी नाशिक अर्पिता ठुबे, कळवणच्या काश्मिरा संखे, प्रांताधिकारी अप्पासाहेब शिंदे, तहसीलदार मुकेश कांबळे, सरपंच सोनाली मोरे आदी उपस्थित होते.

राज्यपाल श्री. देवव्रत म्हणाले की, मला मराठी बोलता येत नाही. मात्र, सचिव प्रशांत नारनवरे यांच्याकडून अर्थ समजून घेतो. मात्र, आपण लवकरच मराठी भाषा शिकून घेणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
यावेळी राज्यपालांनी परिसरात कुटुंबातील सदस्याच्या वाढदिवशी वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करीत परिसर हिरवागार करण्याचे आवाहन केले असता अनेक ग्रामस्थांनी हात वर करून त्यांना प्रतिसाद दिला. तसेच ग्रामस्थांनी गट तयार करून स्वच्छतेचे नियोजन करावे. यामुळे आरोग्याच्या समस्या जाणवणार नाहीत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वतः स्वच्छतेला प्राधान्य देतात. आपण शहरापासून दूर आहोत ही भावना मनात ठेवू नका. स्वतःला कधीच कमी लेखू नका. तसेच आईवडिलांचा सन्मान करताना व्यसनांपासून दूर रहावे. मुलींच्या जन्माचे स्वागत करीत त्यांना समानतेची वागणूक द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

नैसर्गिक शेतीबरोबरच देशी वंशाच्या गायींचे पालन करावे. यामुळे नैसर्गिक शेतीला मदतच होईल. त्यामुळे जमीन सुपीक होऊन उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
पोलीस पाटील संजय धात्रक, उपसरपंच वसंत घडवजे, सामाजिक कार्यकर्ते अमोल धात्रक यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिवाळीच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे कौतुक
यावेळी राज्यपाल श्री. देवव्रत यांनी जिल्हा परिषदेच्या हिवाळी, ता. त्र्यंबकेश्वर येथील शाळेतील विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या शाळेतील विद्यार्थी दोन्ही हाताने लिहू शकतात. याबरोबरच भारतीय राज्य घटनेतील कलमे, एक हजार संख्येपर्यंतचे पाढे म्हणतात. शिक्षक केशव गावित यांच्याकडून त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीची माहिती घेतली. तसेच या विद्यार्थ्यांना राज्यपाल श्री. देवव्रत यांनी भेटवस्तू दिली.
00000
