Pune | Thu, 15 January 2026

No Ad Available

शिक्षकांनी विविध माध्यमांतून गुणवत्तावृद्धीवर भर द्यावा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Admin | 27 views
शिक्षकांनी विविध माध्यमांतून गुणवत्तावृद्धीवर भर द्यावा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली, दि. 11 (जि. मा. का.) : शिक्षणाचा गाभा, आत्मा हा विद्यार्थी आहे आणि त्याला न्याय देणारा शिक्षक आहे. शिक्षकांनी विविध माध्यमांतून शाळेची गुणवत्ता वाढवण्यावर भर द्यावा, तरच शाळेचा पट वाढेल, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.

माहेश्वरी गार्डन मल्टीपर्पज हॉल, सांगली येथे जिल्हा शिक्षक पुरस्कार 2025-26 व पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील क्रीडा पुरस्कार सन 2023-24 व 2024-25 चे वितरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार इद्रिस नायकवडी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन गायकवाड, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेसाहेब लोंढे, पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, शाळेच्या भौतिक सुविधांबरोबरच शाळेमध्ये शिक्षण चांगले असणे आवश्यक आहे. गेल्या काही वर्षांपासून शिक्षकांना चांगले प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर सेवा कालावधीत त्यांना वेतनश्रेणीचा लाभ, पुरस्कार असे सातत्याने प्रयत्न करून शिक्षक हा उत्साहात कसा राहील, तो विद्यार्थ्यांवर मेहनत घेण्यासाठीची प्रेरणा असणारा कसा राहील असा शासनाचा प्रयत्न सुरू आहे. नवीन शिक्षण धोरणांनुसार शिक्षकांना फार मोठी भूमिका निभावावी लागणार आहे. शिक्षकांनी विविध माध्यमातून शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे ते म्हणाले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, सांगली जिल्ह्यातील मॉडेल स्कूल योजनेचा पॅटर्न राज्याने निवडला. सांगली जिल्ह्यात तीन टप्प्यात 449 शाळा मॉडेल स्कूल केल्या. चौथ्या टप्प्यासाठी 48 कोटी रूपयांची तरतूद केली आहे. अनेक शाळांमध्ये सोलर पॅनेल लावण्यात आले आहेत. रोबोटिकबाबतची माहिती लहानपणापासून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सांगली जिल्ह्यातील पीएम श्री मध्ये 13 व सीएम श्री मध्ये 25 शाळांची निवड केलेली आहे. पीएम श्री मधील निवड केलेल्या शाळांसाठी केंद्रातून तर सीएम श्री मध्ये निवड केलेल्या शाळासाठी राज्य शासनाचा निधी येतो. या माध्यमातून शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. प्रामुख्याने बालवाडी, प्राथमिक, व माध्यमिकमध्ये इयत्ता 5 वी व 6 वी यावर सर्वांनी विशेष लक्ष केंद्रित करावे.

सद्या क्रीडा क्षेत्रात करिअर करण्यास मोठा वाव आहे. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्य पातळीवर पदक प्राप्त खेळाडूंना विविध सवलती देण्यात आल्या आहेत. खेळाडूंनी मन लावून देशासाठी खेळून देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करावे, असे सांगत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुरस्कारप्राप्त शिक्षक व क्रीडापटूंना शुभेच्छा दिल्या.

आमदार इद्रिस नायकवडी म्हणाले, ज्यावेळी शिक्षक म्हणून रूजू होतो तोच त्यांचा पुरस्कार असतो. शिक्षक पुरस्कार देताना शिक्षक म्हणून रूजू झाल्यानंतर त्यांनी ज्या ज्या ठिकाणी काम केले त्या ठिकाणी त्यांनी शाळेचा किती पट वाढविला या निकषाचा शिक्षक पुरस्कार निवडीसाठी समावेश होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

शिक्षक पुरस्कार प्राप्त उपशिक्षक गोपाल पाटसुपे व क्रीडा पुरस्कार प्राप्त क्रीडा शिक्षक विजयकुमार शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते जिल्हा शिक्षक पुरस्कार 2025-26 व पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील क्रीडा पुरस्कार सन 2023-24 व 2024-25 चे वितरण करण्यात आले.         प्रारंभी मान्यवरांच्या हस्‍ते दीप प्रज्वलन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन गायकवाड यांनी केले. कार्यक्रमास पुरस्कार प्राप्त शिक्षक, खेळाडू यांच्यासह त्यांचे नातेवाईक तसेच शिक्षक, शिक्षिका, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000


Join WhatsApp