
धर्म आणि मानवतेच्या रक्षणासाठी ज्यांनी आपले जीवन अर्पण केले, असे महापुरुष इतिहासात अजरामर झाले आहेत. शीख परंपरेतील नववे गुरु श्री गुरु तेग बहादुर साहिबजी हे असेच एक महान व्यक्तिमत्त्व होते. त्यांना ‘हिंद दी चादर’ म्हणजेच भारतभूमीचे संरक्षण करणारे कवच म्हणून ओळखले जाते. धर्मस्वातंत्र्य, न्याय आणि सहिष्णुतेसाठी त्यांनी दिलेले बलिदान भारतीय संस्कृतीतील अत्यंत गौरवास्पद अध्याय आहे. त्यांच्या विचारांप्रमाणे जीवन जगणे हीच त्यांना खरी आदरांजली आहे.

श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचा जन्म एप्रिल १६२१ मध्ये अमृतसर येथे झाला. ते शीख धर्माचे सहावे गुरु श्री गुरु हरगोबिंद आणि माता नानकी यांचे सुपुत्र होते. त्यांचे मूळ नाव त्यागमल होते. लहान वयातच एका युद्धात त्यांनी अपूर्व शौर्य दाखवले. त्यामुळे त्यांना ‘तेग बहादुर’ म्हणजेच शूर आणि तळपती तलवारीसारखे धैर्यवान असे नाव मिळाले. १६६४ मध्ये त्यांना गुरु पदाची दीक्षा मिळाली.
त्या काळात देशात क्रूर राजवटीमुळे मोठ्या प्रमाणावर धार्मिक अत्याचार सुरू होते. लोकांवर जबरदस्तीने धर्मांतर लादले जात होते. धर्म, श्रद्धा आणि संस्कृती नष्ट करण्याचे प्रयत्न होत होते. सामान्य जनता छळ, अन्याय आणि भीतीच्या वातावरणात जगत होती. या सगळ्या परिस्थितीमुळे समाजात मोठा हाहाकार माजला होता.
अशा कठीण काळात श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांनी अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी धर्म आणि मानवतेच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत संघर्ष केला. मुघल सत्ताधीशांनी त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर अमानुष अत्याचार केले, तरीही त्यांनी आपला संकल्प सोडला नाही. अखेर त्यांनी धर्मस्वातंत्र्यासाठी सर्वोच्च बलिदान दिले. सत्य, करुणा, संयम आणि चारित्र्याचा संदेश देत ते शहीद झाले.
त्यांचे जीवन निर्भयता, त्याग आणि मानवतेचे प्रतीक आहे. त्यांच्या शिकवणीचा संदेश बालक, युवक आणि प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे. त्यांच्या बलिदानामुळे धर्म अबाधित राहिला. यावर्षी त्यांच्या शहिदीला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने राज्यात आणि देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विभागातर्फे आणि श्री गुरु तेग बहादुर साहिबजी ३५० शहीदी समागम राज्यस्तरीय समितीच्या माध्यमातून विविध प्रबोधनात्मक उपक्रम राबवले जात आहेत. हे उपक्रम केवळ श्रद्धांजली नसून त्यांच्या विचारांची ज्योत पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न आहे.
७ डिसेंबर २०२५ रोजी नागपूर येथील सुरेश चंद्र सुरी मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय मॅरेथॉन, रॅली, भक्तीगीत, स्मरणिका प्रकाशन असे अनेक सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवले जात आहेत.
ग्रंथाला गुरु मानावे आणि धर्माचे रक्षण करणारा माणूस घडवावा, ही श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांची शिकवण होती. त्यांच्या शौर्य, त्याग आणि विचारांचे स्मरण करून जीवन समृद्ध करणे हेच खरे धर्मकर्तव्य आहे.
०००
संकलन – जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्ग
