Pune | Thu, 15 January 2026

No Ad Available

सिंहस्थ कुंभमेळा २०२७ प्रशासकीय यंत्रणांनी अतिरिक्त मनुष्यबळासाठी आवश्यक सेवा-सुविधाचा आराखडा 15 जानेवारीपर्यंत सादर करावा – आयुक्त शेखर सिंह

Admin | 12 views
सिंहस्थ कुंभमेळा २०२७ प्रशासकीय यंत्रणांनी अतिरिक्त मनुष्यबळासाठी आवश्यक सेवा-सुविधाचा आराखडा 15 जानेवारीपर्यंत सादर करावा – आयुक्त शेखर सिंह

नाशिक, दि. ३१ (जिमाका वृत्तसेवा) :  नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा यशस्वी व सुरळीत पार पाडण्यासाठी विविध शासकीय यंत्रणांना अतिरिक्त मुनष्यबळाची आवश्यकता आहे. सर्व प्रशासकीय यंत्रणांनी या अतिरिक्त मनुष्यबळासाठी कुंभ कालावधीत लागणाऱ्या आवश्यक सेवा- सुविधांचा अंदाजित आराखडा 15 जानेवारी 2026 पर्यंत सादर करावा, असे निर्देश कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिले.

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभहमेळा प्राधिकरण सभागृहात आयोजित बैठकीत आयुक्त श्री. सिंह बोलत होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, आरोग्य उपसंचालक डॉ. कपिल आहेर, महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.चारूदत्त शिंदे,  आरोग्य सहाय्यक संचालक डॉ. योगेश चित्ते, विभागीय वाहतूक अधिकारी किरण भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक लोणे, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत शेटे, तहसीलदार प्रदीप वर्पे, इंडियन सिक्युरिटी प्रेसचे व संयुक्त महाप्रबंधक शैलेश अवचट, उप महाप्रबंधक अर्पित धवन यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

आयुक्त श्री सिंह म्हणाले की, प्रत्येक शासकीय विभागाने जिल्ह्याबाहेरून  तैनात करण्यात येणाऱ्या मनुष्यबळासाठी त्यांचे निवास, जेवण-पाणी व्यवस्था, वाहतूक, आवश्यक वैद्यकीय सुविधा, व इतर कल्याणकारी बाबींचा सूक्ष्म विचार करून नियोजन करावे. विहित नमुन्यात आराखडा सादर करताना जिल्ह्यातील, जिल्ह्याबाहेरील, पदनिहाय वर्ग 1 ते 4 या श्रेणीनुसार, आगमनाचा दिनांक, मुक्कामाचा कालावधी, मुक्कामाचे ठिकाण, तैनातीचे ठिकाण यानुसार माहिती सादर करणे आवश्यक आहे. प्रत्येक विभागाने तैनात करण्यात येणाऱ्या अतिरिक्त मनुष्यबळांचे शहरातील स्थळे निश्चित करावीत. त्यांच्या रहिवासाच्या व्यवस्थेसाठी  मंगल कार्यालये, धर्मशाळा, आश्रम यासारख्या संस्थांना प्रत्यक्ष भेट देवून तेथील उपलब्ध सेवा-सुविधांची पाहणी करूनच ती निश्चित करावीत. ज्या ठिकाणी 2 हजार पेक्षा कमी मनुष्यबळ वास्तव्यास राहणार आहेत त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येक दिवशी फिरत्या बाह्यरूग्ण शिबिराची व्यवस्था करावी व ज्या ठिकाणी 5 हजार पेक्षा जास्त मनुष्यबळ वास्तव्यास राहणार आहे त्याठिकाणी कायमस्वरूपी  आरोग्य यंत्रणा कार्यरत ठेवण्याबत त्यांनी सूचित केले.

पोलिस विभागासाठी जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या मनुष्यबळासाठी पावसाळा कालावधीत रेनकोट व  सहसाहित्य उपलब्ध करून देण्यासाठी सामाजिक दायित्व निधीसाठी प्रयत्न करावेत. तसेच कुंभ पर्वणी काळात या मनुष्यबळाची वाहतुक व्यव्यस्थेचेही नियोजन करण्यासह आरोग्य सेवा,  दोन्ही वेळेच्या भोजनासाठी  मध्यवर्ती स्वयंपाकघर, निवासस्थांनाच्या ठिकाणी वेळेत भोजन पोहचविण्याची व्यवस्था यांचे चोख नियोजन करण्याच्या सूचना आयुक्त श्री. सिंह यांनी यावेळी दिल्या.

मनुष्यबळाच्या निवासासाठी इंडिया सिक्युरिटी प्रेसचे नेहरूनगर येथे असलेले रिक्त असलेल्या निवासस्थानाच्या दुरूस्तीबाबत व ही निवासस्थाने तात्पुरत्या स्वरूपात सुपूर्द करण्यात बाबतच्या आवश्यक परवानग्या याबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना महानगरपालिका आयुक्त श्रीमती खत्री यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.


Join WhatsApp