Pune | Thu, 15 January 2026

No Ad Available

तुती बीजकोष, टसर रेशीम खरेदीसाठी ९४ लाखांचा निधी मंजूर; राज्यातील रेशीम शेतकऱ्यांना रेशीम संचालनालयाचे प्रोत्साहन

Admin | 14 views
तुती बीजकोष, टसर रेशीम खरेदीसाठी ९४ लाखांचा निधी मंजूर; राज्यातील रेशीम शेतकऱ्यांना रेशीम संचालनालयाचे प्रोत्साहन

मुंबई, दि. २६: महाराष्ट्र शासनाच्या रेशीम संचालनालयामार्फत २०२५–२६ या आर्थिक वर्षात हमी भावाने खरेदी करण्यात आलेल्या तुती बीजकोष व रिलिंग कोष (रेशीम धागा निर्मितीकरिता आवश्यक) यासाठी  ९४.०७ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. वस्त्रोद्योग विभागामार्फत शुक्रवार, २६ डिसेंबर रोजी याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला.

राज्यातील रेशीम शेतकऱ्यांना दर्जेदार व रोगमुक्त अंडीपुंज (डीएफएल) पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथील शासकीय अंडीपुंज निर्मिती केंद्रात तुती रेशीम अंडीपुंजांची निर्मिती करण्यात येते. या प्रक्रियेत बीजकोष उत्पादक रेशीम शेतकऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, त्यांच्याकडून खरेदी करण्यात येणाऱ्या बीजकोषांपासून अंडीपुंज निर्मिती केली जाते.

२०२५–२६ या वर्षात कोल्हापूर, सातारा व पुणे जिल्ह्यांतील ८५ तुती बीजकोष उत्पादक रेशीम शेतकऱ्यांकडून ६९४१.८०० किलो बीजकोषांची खरेदी करण्यात आली असून, त्यासाठी ८८,५७,३५५ रुपये अदा करण्यात येणार आहेत. पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया व भंडारा जिल्ह्यांतील टसर रेशीम शेतकऱ्यांकडून ५,४९,५०० रुपयांच्या रिलिंग कोष खरेदी करण्यात आली आहे. या दोन्ही खरेदींसाठी  ९४,०६,८५५ रुपये इतका निधी बीजकोष उत्पादक रेशीम शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी वित्त विभागाने मंजूर केला आहे, याबाबतचा शासन आदेश वस्त्रोद्योग विभागाने जारी केला आहे.

या शासन निर्णयामुळे बीजकोष उत्पादक शेतकऱ्यांची भांडवली गरज भागविण्यास मदत होणार असून, पुढील बीजकोष उत्पादनासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. राज्यातील रेशीम अंडीपुंज पुरवठा सुरळीत राहून रेशीम उद्योगास चालना मिळण्यास यामुळे मदत होणार आहे. बीजकोष, रेशीम कीटक पालन, कोष निर्मिती तसेच धागा व कापड निर्मिती आदी रेशीम उद्योगातील सर्व टप्प्यांचे सक्षमीकरण करून महाराष्ट्राला एक अग्रगण्य रेशीम उत्पादक राज्य बनविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्याअनुषंगाने जैव सुरक्षा, स्वच्छता व दर्जा आदी मानकांचे काटेकोर पालन करून दर्जेदार बीजकोष उत्पादन करण्याचे आवाहन रेशीम संचालनालयाने केले आहे.

0000

काशिबाई थोरात/विसंअ

 


Join WhatsApp