Pune | Thu, 15 January 2026

No Ad Available

उपराष्ट्रपतीपदी सी.पी. राधाकृष्णन यांची निवड अभिमानास्पद : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिनंदन

Admin | 32 views
उपराष्ट्रपतीपदी सी.पी. राधाकृष्णन यांची निवड अभिमानास्पद : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिनंदन

मुंबई दि. ९ : देशाच्या उपराष्ट्रपतीपदी सी.पी. राधाकृष्णन यांची झालेली निवड आम्हा सगळ्यांसाठी अभिमानास्पद आहे, त्यांचे मनापासून अभिनंदन अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद व्यक्त केला आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल असलेले राधाकृष्णन यांची एनडीए आघाडीतर्फे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून निवड झाली तेव्हाच त्यांच्या विजयाची खात्री होती, असे सांगून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री.राधाकृष्णन यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या संदेशात ते म्हणतात की, राज्यपाल म्हणून राधाकृष्णन यांनी राज्यात दिलेले योगदान आणि राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले मार्गदर्शन अतिशय बहुमूल्य आहे. विविध विकासकामे, शैक्षणिक सुधारणा त्याचप्रमाणे सामाजिक ऐक्य व सद्भावना वाढविण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न उल्लेखनीय होते.

तामिळनाडूमध्ये जन्मलेल्या राधाकृष्णन यांनी वयाच्या १७ व्या वर्षी भारतीय जनसंघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून सक्रियपणे जनसेवा करण्यास सुरुवात केली. दोन वेळा खासदार होऊन कालांतराने तेलंगणाचे राज्यपाल आणि पुद्दुचेरीचे उपराज्यपाल म्हणूनही त्यांनी यशस्वीपणे काम पाहिलं आहे. त्यांचा हा प्रदीर्घ राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनुभव त्याचप्रमाणे प्रामाणिकपणा व संवेदनशील दृष्टीकोन हा देशवासीयांसाठी निश्चितच अतिशय महत्त्वाचा ठरेल असे सांगून एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या जनतेतर्फे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
भारताचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून सी. पी राधाकृष्णन या पदाची प्रतिष्ठा आणखी वृद्धिंगत करतील, असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारताचे नवनिर्वाचित उपराष्ट्रपती आणि महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून आजवर श्री.राधाकृष्णन यांनी केलेले मार्गदर्शन अमूल्य राहिले आहे. यापुढेही त्यांचा प्रवास लोककल्याणकारी आणि यशस्वी ठरावा, अशी मनोकामना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

0000


Join WhatsApp