Pune | Fri, 17 April 2026

No Ad Available

‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उपसंचालक नवनाथ फरताडे यांची ‘मिशन लक्षवेध’बाबत मुलाखत

Admin | 11 views
‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उपसंचालक नवनाथ फरताडे यांची ‘मिशन लक्षवेध’बाबत मुलाखत

मुंबई, दि. : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात राज्याच्या क्रीडा विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन लक्षवेध’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाविषयी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे, मुंबई विभागाचे उपसंचालक नवनाथ फरताडे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. युवकांना क्रीडा क्षेत्रात अधिकाधिक संधी उपलब्ध करून देणे, ग्रामीण व शहरी भागातील गुणवंत खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देणे आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी खेळाडू घडविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे फरताडे यांनी या मुलाखतीत सांगितले.

‘दिलखुलास’ कार्यक्रमातील ही मुलाखत मंगळवार, दि.7 आणि बुधवार दि. 8 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर प्रसारित होणार आहे. तसेच न्यूज ऑन एआयआर (News On AIR) या मोबाईल ॲपवरही ही मुलाखत उपलब्ध ऐकता येईल.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत बुधवार, दि. 8 एप्रिल 2026 रोजी रात्री 8.00 वाजता माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवर प्रसारित होणार आहे. या मुलाखतीचे सूत्रसंचालन निवेदक हर्षदा कुलकर्णी यांनी केले आहे.

‘मिशन लक्षवेध’ ही योजना राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार असून मोठ्या संख्येने प्रतिभावान खेळाडूंचा यात समावेश करण्याचे उद्दिष्ट आहे. याअंतर्गत निवड प्रक्रिया पारदर्शक आणि गुणवत्ताधारित ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, तज्ज्ञ समितीमार्फत मूल्यमापन तसेच स्पष्ट निकषांच्या आधारे निवड चाचण्या घेण्यात येणार आहेत.

या योजनेत निवड झालेल्या खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण, दर्जेदार क्रीडा साहित्य, आहार मार्गदर्शन, निवास व्यवस्था तसेच वैद्यकीय आणि मानसोपचार सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. विशेषतः स्पोर्ट्स सायन्स सेंटरच्या माध्यमातून फिटनेस चाचण्या, इजा प्रतिबंध, पुनर्वसन, आहारतज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि वैज्ञानिक प्रशिक्षण सुविधा दिल्या जाणार आहेत.

या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्थानिक प्रशासन आणि क्रीडा विभाग यांच्यात समन्वय साधून करण्यात येत असलेले नियोजनबद्ध काम तसेच मुंबई विभागातील निवड चाचण्यांचे नियोजन व अंमलबजावणी याबाबतही ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमातून सविस्तर माहिती देण्यात आली आहे. पात्र खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन देखील या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपसंचालक फरताडे यांनी केले आहे.

समाजमाध्यमांचे दुवे –

X (Twitter) : https://twitter.com/MahaDGIPR

Facebook : https://www.facebook.com/MahaDGIPR

YouTube : https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

०००

जयश्री कोल्हे/स.सं.


Join WhatsApp