
नाशिक, दि. २० (जिमाका): ‘हिंद दी चादर’ गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमानिमित्त 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 रोजी नवी मुंबई येथील खारघर येथे भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांसाठी नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार असल्याने त्यांच्या सुरक्षित व सुरळीत प्रवासासाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिल्या.

विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरिक्षक दत्तात्रय कराळे, उपायुक्त अरविंद लोखंडे यांच्यासह विभागातील जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक, निवासी उपजिल्हाधिकारी तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त डॉ. गेडाम म्हणाले की, कार्यक्रमांसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी पुरेशा वाहनांची व्यवस्था करण्यात यावी. प्रत्येक जिल्ह्यातून जाणाऱ्या भाविकांच्या संख्येनुसार वाहनांचे नियोजन करून त्यांना सुरक्षितपणे कार्यक्रमस्थळी पोहोचविण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांनी घ्यावी. भाविकांसोबत नोडल अधिकारी अथवा संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. संबंधित अधिकाऱ्यांची नावे, बसेसची संख्या व भाविकांची एकूण संख्या याबाबतची माहिती प्रशासनाकडे सादर करावी. तसेच सर्व बसेस व वाहनांना स्वतंत्र क्रमांक देण्यात यावेत आणि कार्यक्रमस्थळी पार्किंगची योग्य व्यवस्था करावी. या कार्यक्रमाची व्यापक स्तरावर जनजागृती करावी. या सर्व उपक्रमांची माहिती नियमितपणे सादर करावी. असेही विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी सांगितले.
विशेष पोलीस महानिरीक्षक कराळे यांनी पाचही जिल्ह्यांतून जाणाऱ्या भाविकांची तसेच बसेसची सविस्तर माहिती संबंधित जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांना देण्यात यावी, जेणेकरून सुरक्षा नियोजन प्रभावीपणे करता येईल, असे सांगितले.
विभागीय आयुक्त् कार्यालयातील अरविंद लोखडे म्हणाले की, नाशिक विभागातील शैक्षणिक संस्थेमार्फत चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, सतिंदर सरताज यांचे गाणे तसेच प्रभातफेरी आदी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तसेच आरोग्य विभागाने आरोग्य शिबिर, ग्रामपंचायतीमार्फत ग्रामसभा घेण्यात येत असून या व इतर विविध उपक्रमांचे छायाचित्र संकेतस्थळावर अपलोड करावे. तसेच विभागातील सर्व चित्रपटगृहात सतिंदर सरताज यांचे गाणे दाखविण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
०००
