Pune | Fri, 17 April 2026

No Ad Available

‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाच्या यशस्वीतेसाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Admin | 13 views
‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाच्या यशस्वीतेसाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर, दि. ९ : सर्व नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. माझं गाव, आरोग्य संपन्न गाव हे अभियान  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामआरोग्य विचारापासून प्रेरित आहे. या अभियानाच्या यशस्वीतेसाठी आरोग्य यंत्रणेसह सर्वांनी परिश्रम घ्यावे, तसेच या अभियानाच्या जनजागृती तसेच माहितीसाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा लवकरात लवकर आयोजित करण्याचे निर्देश महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे दिले.

सदर येथील जिल्हा नियोजन भवन येथे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माझं गाव, आरोग्य संपन्न गाव या अभियानाचा जिल्हास्तरीय आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, जिल्हा शल्य चिकित्सक डॅा. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा. राजकुमार गहलोत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) कपिलनाथ कलोडे, जिल्हास्तरीय समितीचे सदस्य डॉ. राजीव पोतदार आदी उपस्थित होते.

माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान आरोग्याच्या दृष्टिकोनातून गावाच्या सर्वांगीण सुधारणेचे व्यापक व्यासपीठ आहे. यामध्ये मुलभूत आरोग्य सेवा, पोषण, स्वच्छता, शुद्ध पिण्याचे पाणी, जनजागृती, संगणीकृत आरोग्य माहिती संकलन, प्रशिक्षण व शासन यंत्रणेमध्ये समन्वयांचा समावेश आहे. आरोग्य हे ग्रामविकासाच्या केंद्रस्थानी असल्याचे प्रतिपादन या अभियानाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या राज्यस्तरीय अभियानात नागपूर जिल्ह्याचा प्रथम क्रमांक आणण्याचे आवाहन पालकमंत्री बावनकुळे यांनी यावेळी केले.

या अभियानाशी संदर्भात आयोजित होणा-या कार्यशाळेस सरपंच आणि ग्रामसेवक यांना बोलाविण्यात यावे. लवकरात लवकर ही कार्यशाळा घेण्याचे नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

०००


Join WhatsApp