
मुंबई, दि. २५ :- राज्यात वाचन संस्कृती अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक धोरणांतर्गत २०११ पासून प्रत्येक जिल्ह्यात ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. याच परंपरेचा भाग म्हणून मुंबई शहर जिल्ह्याचा ‘ग्रंथोत्सव’ २७ व २८ मार्च रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
मुंबई शहर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर यांच्या संयुक्त विद्यमाने या ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रंथोत्सवाच्या पूर्वतयारीसंदर्भात दादर येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कार्यालयात जिल्हा ग्रंथोत्सव समन्वय समितीची बैठक पार पडली.
बैठकीस जिल्हा ग्रंथोत्सव समितीचे अध्यक्ष व कोकण विभागाचे प्रभारी सहाय्यक ग्रंथालय संचालक प्रशांत पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी शशिकांत काकड, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे प्रमुख कार्यवाह रवींद्र गावडे, कार्यवाह उमा नाबर, शिक्षण उपनिरीक्षक कार्यालयाचे प्रतिनिधी विजय सावंत, बृहन्मुंबई जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष दिलीप कोरे, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे प्रतिनिधी अशोक मुळे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रतिनिधी किरण वाघ, सुनील आग्रे, सुधाकर पवार हे समिती सदस्य उपस्थित होते.
या ग्रंथोत्सवामध्ये वाचन संस्कृती जोपासण्यासाठी विविध दर्जेदार व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यात ग्रंथदिंडी, चर्चासत्रे, परिसंवाद, कथाकथन, व्याख्याने, ‘लेखक आपल्या भेटीला’ उपक्रम, कवी संमेलन तसेच उत्कृष्ट ग्रंथालयीन पदाधिकारी, कर्मचारी, वाचक व सभासदांचा गौरव समाविष्ट आहे.
तसेच, साहित्यविश्वातील नामवंत लेखकांच्या ग्रंथसंपदेची दालने, शासकीय प्रकाशनांचे स्टॉल, तसेच दुर्मिळ ग्रंथांचे विशेष प्रदर्शन वाचनप्रेमींसाठी खुले असणार आहे. विविध वयोगटांतील नागरिकांनी या ग्रंथोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन वाचन संस्कृतीच्या या चळवळीला बळ द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
0000
किरण वाघ/विसंअ
